आफ्रिदीने खोटारडेपणाने केला विश्वविक्रम

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी याचा खोटारडेपणा सोमवारी जगजाहीर झाला. शाहीद आफ्रिदीने सोमवारी सोशल साईटवर मी आज 44 वा वाढदिवस साजरा करतोय असे स्वतःहून कबूल केले.

याचा अर्थ 1996 साली नैरोबी येथे श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत त्याने 102 धावांची जी विश्वविक्रमी खेळी केली होती तेव्हा तो 19 वर्षांचा होता. आज ते अधिकृतपणे सर्वांसमोर आले. त्यामुळे वन डे क्रिकेटमधील सर्वात कमी वयामध्ये झळकवलेल्या शतकवीरांच्या यादीत शाहीद आफ्रिदी आता पहिल्या स्थानावर नसेल. त्याच्याऐवजी अफगाणिस्तानचा उस्मान घानी याची पहिल्या स्थानावर वर्णी लागेल.

अफगाणिस्तानच्या फलंदाजाचे वय 17 वर्षे व 242 दिवस

अफगाणिस्तानच्या उस्मान घानी याने 17 वर्षे व 242 दिवसांचा असताना बुलवायो येथे झिम्बाब्वेविरुद्धच्या लढतीत 118 धावांची खेळी साकारली होती. ही लढत 20 जुलै 2014 रोजी पार पडली. मात्र या लढतीत झिम्बाब्वेने आठ गडी राखून विजय मिळवला होता; पण उस्मान घानीची ही खेळी आता सर्वोच्च स्थानी असणार आहे.

चुकीची माहिती

क्रिकेटमध्ये पदार्पण केले तेव्हा शाहीद आफ्रिदी 16 वर्षांचा होता असे म्हटले गेले. मात्र ही माहिती चुकीची होती. सोमवारी त्याने स्वतःहून आपण 44 वर्षांचा झालो असे कबुल केल्यामुळे त्याची जन्मतारीख 1 मार्च 1980 ऐवजी 1 मार्च 1977 ही आहे हे सर्वांसमोर आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या