राजर्षी शाहू महाराज समाधिस्थळाच्या दुसऱया टप्प्यातील सुशोभीकरणाचा मार्ग मोकळा , 9 कोटी 40 लाख रुपयांचा निधी वर्ग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूर महापालिका हद्दीतील लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारकस्थळाच्या सुशोभीकरणासाठी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत 9 कोटी 40 लाख 56 हजारांचा निधी जिह्याला वर्ग करण्यात आला आहे. यामधून दुसऱया टप्प्यातील सुशोभीकरण व इतर कामे करण्यात येणार आहेत. ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनें’तर्गत हा निधी देण्यात आला आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या सर्व निर्णयांना शिंदे-फडणवीस सरकारकडून स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे हा रखडलेला निधी तातडीने मिळावा तसेच छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारक स्थळाच्या दुसऱया टप्प्यातील रखडलेल्या कामास सुरुवात व्हावी, अशी मागणी शाहूप्रेमी जनतेकडून करण्यात आली होती. या संदर्भात आंदोलनेही झाली होती.

छत्रपती शाहू महाराज यांच्या इच्छेनुसार आणि शाहूप्रेमी जनतेच्या मागणीनंतर महानगरपालिकेकडून सिद्धार्थनगर परिसरातील नर्सरी बागेत महापालिकेच्या स्वनिधीतून पहिल्या टप्प्यात हे स्मारक उभारण्यात आले, तर उर्वरित दुसऱया टप्प्यातील कामासाठी महापालिकेकडून दहा कोटींचा प्रस्ताव देण्यात आला होता.

या सुविधा होणार

दुसऱया टप्प्यांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक हॉल नूतनीकरण, आर्ट गॅलरी, डॉक्युमेंटरी दाखवण्याची सोय, दलित मित्र दादासाहेब शिर्के उद्यान कंपाउंड वॉल लँडस्केपिंग, पार्ंकग, टॉयलेट आदी सुविधा करण्यात येणार आहेत. समाजकल्याण विभाग व कोल्हापूर महापालिका यांच्या समन्वयाने ही कामे करण्यात येणार असल्याचे समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी सांगितले.