शाकंभरी नवरात्र उत्सवाची सांगता: जोगेश्वरी, इंद्रगढी देवीच्या गडावर विविध कार्यक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । घाटनांद्रा

घाटनांद्रा येथून चार किलोमीटर अंतरावर सागमाळ शिवारात डोंगराच्या कुशीत वसलेल्या डोंगरनिवासिनी असलेल्या जोगेश्वरी व इंद्रगढी देवीच्या गडावर सात दिवसांपासून सुरू असलेल्या शाकंभरी नवरात्र उत्सवाची सांगता पौष शुक्लपक्ष पौर्णिमा सोमवारी उत्साहात करण्यात आली. यानिमित्त सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सोमवारी सकाळी विश्वस्त सांडू कोठाळे व रघुनाथ मोरे यांच्या हस्ते व पुजारी अशोकराव गुरुजी व विनायक गुरुजी या ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात देवीचा पंचामृताने स्नानविधी करून पूजा अभिषेक करण्यात आला. होमहवन करण्यात येऊन सर्व भाविकांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. त्यानंतर भाविकांना प्रसाद वाटप करण्यात येऊन सात दिवस चाललेल्या शाकंभरी नवरात्र उत्सवाची सांगता करण्यात आली. सप्तशतीचे पाट, देवीची मुरली अलंकार पूजा व विविध धार्मिक कार्यक्रम झाले. या शुभ पर्वकाळावर भाविकांनी देवीच्या गडावर दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

यावेळी संस्थानचे पुंडलिकराव मोरे सांडुअप्पा कोठाळे, कृष्णा मोरे, सुनील मोटे, सुरेशसिंग बिसेन, सुखदेव भाग्यवंत, अमृत पाटील, प्रकाश बारस्कर, माधवराव तायडे, अशोकराव जोशी रघुनाथ मोरे, सुरेश गुळवे, समाधान सोनवणे, दगडुलाल खत्री, राम मोरे, त्र्यंबक सोनवणे, भागवत ताजने, लक्ष्मण जाधव, भोले महाराज आदींची उपस्थिती होती.