आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या हे धोरण घातक, रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांनी मोदी सरकारचे कान टोचले

केंद्र सरकारने उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ वाढविला पाहिजे. अर्थव्यवस्थेत गुणात्मक वाढ होईल अशा पद्धतीने खर्च केला पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मांडली आहे. ‘अंथरुण पाहून पाय पसरा’ अशी अप्रत्यक्ष सूचनाच दास यांनी केली आहे.

1 फेब्रुवारीला केंद्र सरकार 2021-22 या आर्थिक वर्षाचे बजेट मांडणार आहे. 2020 हे वर्ष कोरोनाग्रस्त गेले. याचा जबर फटका अर्थव्यवस्थेला बसला आहे. अनलॉकनंतर अर्थव्यवस्था हळूहळू रुळावर येण्याचे प्रयत्न सुरू असले तरी परिस्थिती सुधारलेली नाही. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी एका व्हर्च्युअल कार्यक्रमात आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.

गव्हर्नर दास काय म्हणाले?

गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मल्टिप्लायर इफेक्ट आणि रिस्क फॅक्टरचा उल्लेख केला आहे. आपले उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ असणे खूप गरजेचे आहे. खर्च करताना अर्थव्यवस्थेत गुणात्मक वाढ कशी होईल हे पाहिले पाहिजे.

गेल्या नऊ महिन्यांत शेअर बाजारात विदेशी गुंतवणूकदारांकडून मोठा पैसा आला. देशांतर्गत बाजारात 20 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली; पण इक्विटीमध्ये गुंतवणूक अचानक बंद होऊ शकते. विदेशातून येणारा पैसा कमी होऊ शकतो.

कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर कमी परिणाम व्हावा यादृष्टीने रिझर्व्ह बँकेने पावले उचलली. त्याचा सकारात्मक परिणाम दिसत आहे.

सरकारी आणि खासगी बँकांनी आपले भागभांडवल वाढविण्यासाठी जोरात प्रयत्न केले पाहिजेत. सध्यस्थितीचा फायदा घेऊन बँकांची आर्थिक स्थिती सुधारावी. बॅलन्सशिट चांगली राहण्यासाठी प्रयत्न करावेत आणि अर्थव्यवस्था सुधारण्यात योगदान द्यावे.

आपली प्रतिक्रिया द्या