कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी असले तरी सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे – शंभूराज देसाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाटण तालुक्यात काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असताना तालुक्यातील बाजारपेठांच्या ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे.गर्दींच्या ठिकाणांमुळे कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तालुका प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडून घालून दिलेल्या निर्बंधाची प्रभावीपणे अंमलबाजवणी करावी.कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पहाता पाटण तालुक्यामध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी असले तरी कोविड 19 चा संसर्गाची साखळी तोडण्यासाठी तालुकास्तरीय सर्व शासकीय यंत्रणांनी सतर्क रहावे,अशा सुचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी पाटण तालुक्यातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

पाटण तालुक्यातील कोरोना संसर्गामुळे बाधित होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी करण्याचेदृष्टीने रविवारी दौलतनगर (ता.पाटण) येथे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली पाटण तालुक्यातील सर्व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली.याप्रसंगी त्यांनी या सुचना दिल्या. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी सुरवातीस तालुक्यात बाधित रुग्णांची माहिती घेऊन तालुक्यातील विविध कोविड केअर सेंटरमधील रुग्णांची संख्या व त्यांचेवर करण्यात येणारे औषधोपचार याची सविस्तर माहिती घेतली व कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये याकरीता आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. सध्या जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची सख्या वाढू लागली असल्याने सर्वांना शासकीय निर्बधांचे पालन करावे लागत आहे. असे असतानाही बाजारपेठांच्या ठिकाणी, विविध दुकानांमध्ये खरेदी करण्याकरीता मोठया प्रमाणांत गर्दी होताना दिसत असल्याने कोरोना संसर्ग पुन्हा मोठया प्रमाणांत वाढण्याची भिती असल्याने सर्व यंत्रणांनी सतर्क राहून शासनाच्या सर्व निर्बंधाची अंमलबजावणी करावी. पाटण तालुक्यामध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण जरी कमी असले तरी कोविड 19 चा संसर्गाची साखळी तोडण्यासाठी तालुकास्तरीय सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे,असे आवाहनही देसाईंनी बैठकीत केले.