
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी सुमार झाली. तीन वेळच्या विजेत्या चेन्नईला यंदा लवकरच गाशा गुंडाळावा लागला. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच धोनीचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचू शकला नाही. या खराब कामगिरीमुळे निराश झालेला दिग्गज ऑस्ट्रेलियन खेळाडू शेन वॉटसन याने क्रिकेटच्या सर्व प्रारूपातून निवृत्ती घेतली आहे.
शेन वॉटसन याने आयपीएल 2018 मध्ये एकट्याच्या बळावर चेन्नईला विजेतेपद मिळवून दिले होते. त्याने दोन वर्षांपूर्वी झालेल्या स्पर्धेत 555 धावा कुठल्या होत्या. मात्र यंदा त्याची आणि संघाची कामगिरी लौकिकाला साजेशी झाली नाही. त्यामुळे त्याने आता यापुढे कोणत्याही स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, 2016 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केलेला शेन वॉटसन आयपीएल आणि अन्य टी-20 लीग खेळत होता. मात्र आता त्याने थांबण्याचा निर्णय घेतला आहे. वयानुसार चपळता कमी झाल्याने आणि खेळही म्हणावा तसा उंचावत नसल्याने त्याने हा निर्णय घेतला आहे.
Thank you Watto Man, for everything. May your next chapter open with a bang, as always. Farewell beloved. 🦁💛 #ThankYouWattoMan #WhistlePodu #Yellove pic.twitter.com/lksEyODg19
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) November 3, 2020
खराब कामगिरी
आयपीएल 2020 मध्ये शेन वॉटसन याची कामगिरी खराब राहिली. त्याने 11 लढतीत फक्त 2 अर्धशतक ठोकले आणि 299 धावा केल्या. त्यामुळे अखेरच्या काही लढतीत त्याला आरामही देण्यात आला.
शेन वॉटसन याने आयपीएल कारकिर्दीत एकूण 145 लढती खेळल्या. यात त्याने 4 शतक आणि 21 अर्धशतक यांच्या मदतीने 3874 धावा केल्या. गोलंदाजीत त्याने 92 बळी घेतले आहेत.
दोनदा चषक उंचावला
2008 पासून आयपीएल खेळणाऱ्या शेन वॉटसन याने दोन वेगवेगळ्या संघाकडून चषक उंचावला आहे. 2008 ला राजस्थान रॉयल्स संघाने तर 2018 ला चेन्नई सुपर किंग्ज संघाने विजेतेपद पटकावले होते.
2008 ला वॉटसन राजस्थानच्या संघात होता. त्यावेळी त्याने 472 धावा ठोकल्या होत्या. तर 2018 ला चेन्नई कडून खेळताना त्याने 555 धावा चोपत संघाला विजेतेपद मिळवून दिले होते.
2016 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम
शेन वॉटसन याने 2016 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याने एकूण कारकिर्दीत 59 कसोटी, 190 एक दिवसीय आणि 58 टी-20 लढतीत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले. यक्त त्याने 10,950 धावा चोपल्या. 2007 आणि 2015 च्या वर्ल्डकप विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचा तो सदस्य होता. तसेच 2012 ला झालेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये त्याला मालिकवीर पुरस्कार मिळाला होता.





























































