शनिअमावस्या असूनही शनिशिंगणापुरात शुकशुकाट, मोजक्या लोकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी संपन्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिअमावास्येनिमित्त शनिशिंगणापुरात भरणारी यात्रा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे दिवसभर मंदिर परिसरात शुकशुकाट दिसून येत होता. दरम्यान, मोजक्या पुरोहितांच्या उपस्थितीत पहाटेची आरती व महापूजा सोहळा पार पडला.

आज अमावास्येचा पर्वकाळ असल्याने काही भाविकांनी शनिशिंगणापूरला हजेरी लावली. मंदिरात प्रवेश नसल्याने देवस्थानने महाद्वार गेटवर लावलेल्या स्क्रीनवर शनैश्वरांचे बाहेरूनच दर्शन करून भाविक निघून जात होते.

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने शनिअमावास्येनिमित्त शनिशिंगणापुरात आज होणारी यात्रा रद्द झाली होती. भाविकांची गर्दी होऊ नये, यासाठी मंदिर दोन दिवस बंद ठेवण्यात आले होते. महाद्वार येथे फलक लावण्यात आले होते. त्यामुळे शुक्रवार आणि शनिवारी दिवसभर सर्वत्र शुकशुकाट दिसून येत होता.

मंदिर बंद असल्याने उलाढाल ठप्प

मंदिर परिसरात देवस्थानच्या सुरक्षाव्यवस्थेसह पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंदिराकडे जाणारे रस्ते शुक्रवारीच बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले होते. यात्राकाळात शनिशिंगणापुरात पाच ते सहा लाख भाविक श्री शनैश्वरांच्या दर्शनासाठी हजेरी लावतात. मागील वर्षी कोरोनामुळे मंदिर बंद होते. यावर्षीही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने मंदिर दोन दिवस बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे येथील उलाढाल ठप्प झाली होती.