श्री शंकरगाथा : अलौकिकतेकडे वाटचाल!

139

दैववशाने प्राप्त झालेल्या, संततीसुखाची पूर्तता करणाऱ्या अन् सर्व ग्रामस्थांचे हृदय जिंकणाऱ्या ‘शंकर’बाळाकडे पाहून चिमणाजी व त्याची पत्नी नित्यनेमाने तिन्ही-त्रिकाळ परमेश्वराचे आभार मानीत असत. त्यांच्या करिता श्रीशिवशंकराच्या कृपाशीर्वादामुळेच सारे काही शक्य झाले होते. अकल्पितपणे वाटय़ाला आलेले पुत्रसुख आपल्याला कायमस्वरूपी मिळत राहावे अशी याचना ते सांबसदाशिवापाशी सातत्याने करीत असत, मात्र या अलौकिक संततीच्या वियोगाचे क्षण काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत याची त्यांना जाणीव नव्हती.

एके दिवशी शंकर आपल्या मातापित्यांस म्हणाला, ‘मी आपणांपासून दूर जाऊ इच्छितो तेव्हा आपण मला आज्ञा द्यावी.’ शंकरबाळाचे हे शब्द उभयतांना कानांमध्ये तप्त लाव्हारस ओतल्याप्रमाणे जाणवू लागले. त्यांच्यावर दुःखाचा घाला घातला गेला. माथ्यावर एकाएकी आकाश कोसळावे असे झाल्याने ते गप्पच राहिले. मुखातून शब्द फुटेना. दोघांनाही विलक्षण मानसिक धक्का बसला, तेव्हा त्यांना सावध करीत शंकर म्हणाला, ‘आपण उभयता काळजी करू नये. मी लहान राहिलेलो नाही. तुम्हांला पुत्रवियोगाचे दुःख होणे साहजिक आहे मात्र त्यामुळे कोसळून जाण्याची गरज नाही. तुमचे येणारे दिवस आनंदाचे आहेत, कारण लवकरच तुम्हांला जुळे संतान प्राप्त होईल.’

शंकरबाळाच्या बोलण्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे मातापित्यांना समजले नाही. या अवचित बसलेल्या धक्क्यातून कसे सावरावे हे उमगेपर्यंत बराचसा कालावधी लोटला. शंकर स्वस्थ, निर्विकार आणि शांत होता. सारेकाही त्याच्याच मर्जीने घडत आहे याची त्याला पूर्ण जाणीव होती. काही दिवसांतच चिमणाजीच्या पत्नीस संतानप्राप्तीची चाहूल लागली. शंकरबाळाची वाचासिद्धी प्रत्ययास येत असल्याचे पाहून उभयतांचे मन आनंदाने भरून गेले. त्यांचा येणारा काळ शिवोपासनेत आणि शंकरबाळावर प्रेम करण्यात व्यतीत होऊ लागला.

पुढील काळ शंकराने भाकीत वर्तविल्याप्रमाणेच घडत होता. चिमणाजीच्या पत्नीचे दिवस सरले आणि ती जुळी लेकरे प्रसविती झाली. जन्मलेल्या दोन्ही पुत्रांचे बारसे मोठय़ा हर्षोल्हासात साजरे करण्यात आले. घरातच नव्हे तर समस्त अंतापूर गावांत आनंदाचे वातावरण पसरले. जो तो चिमणाजीच्या कुटुंबावर कौतुकाचा वर्षाव करीत होता. अपार आनंदी वातावरणात बरेच दिवस सरले आणि अशातच एके दिवशी शंकरबाळाने मातेसमोर आणि पिता चिमणाजीसमोर त्याचा अंतस्थ हेतू उघड केला, ‘ईश्वरी कार्य करण्यासाठी मला येथून जाणे आवश्यक आहे, करिता मला आपण अनुज्ञा द्यावी. केवळ प्रारब्धयोगाने मी आपल्या सहवासात आलो. आपले जिवापाड प्रेम प्राप्त करते झालो, मात्र आता येथे अधिक वेळ काढणे मला शक्य नाही. माझे भविष्यातील कार्य पूर्णत्वाला नेण्याकरिता मला येथून जावेच लागेल.’

शंकरबाळाचे बोलणे ऐकून मातापिता गहिवरले. त्यांनी या लाडक्या बाळाची विनंती मनावर दगड ठेवून मान्य केली. प्रथमतः संततीचे सुख देऊन व त्यानंतर दोन बालकांच्या रूपाने कायमचे पुत्रसुख देऊन पुढे आपल्या निर्धारित कार्यासाठी गृहत्याग करणाऱ्या त्या दैवी बालकास, अखेरचा निरोप देतांना त्यांचे हृदय गलबलून आले. शंकरानेदेखील अधिक वेळ न दवडता मातापित्यांना साष्टांग वंदन केले, लौकिकार्थाने अंतापूरची वेस ओलांडली आणि त्याचा अलौकिक प्रवास ‘श्रीशंकर महाराज’ होण्याच्या दिशेने आगेकूच करता झाला.

 इथे चिमणाजी व त्यांच्या पत्नीची दारुण अवस्था झाली. मन भरून आले होते, डोळ्यातून वाहणाऱ्या संततधारेला खंड कसा तो नव्हताच. शंकरबाळाच्या वियोगाचे दुःख त्यांच्या मनांत खोलवर रुतले होते. मात्र येत्या काळांत त्यांच्या आठवणींची धार बोथट होणार होती, वियोगदुःख सरणार होते आणि दैनंदिन कामकाजामध्ये ते दंग होणार होते कारण ‘हा सृष्टीचा नियम आहे’ हे शंकर जाणून होता. त्याच्या अष्टावक्र चालीने अंतापुराची वेस ओलांडल्याचे तेथील ग्रामस्थांनी पाहिले मात्र शंकराची पुढील मार्गक्रमणा पाहणे त्यांना शक्य झाले नाही कारण, वामनरुपाने तीन पावलात ब्रह्मांड व्यापणारा शंकर मनोवेगाच्या बळावर थेट हिमालय पर्वताच्या दिशेने निघाला.

आपली प्रतिक्रिया द्या