केवळ न्यायदानात विलंब टाळण्यासाठी आर्टिफिशल इंटेलिजन्स शक्य, सरन्यायाधीश शरद बोबडे यांचे वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

न्यायदान हे मानवी सदसद्विवेकबुद्धीचे काम आहे. रोबो हे काम करू शकत नाही. केवळ न्यायदानातील प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी रोबो म्हणजेच ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’चा वापर शक्य आहे, असे वक्तव्य सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी व्यक्त केली आहे. देशभरातील न्यायालयात प्रलंबित असलेल्या हजारो खटल्यांच्या पार्श्वभूमीवर बोबडे यांनी हे महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे.

बंगळुरू येथे न्यायिक अधिकाऱयांच्या द्विवार्षिक परिषदेचे उद्घाटन सरन्यायाधीश बोबडे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोबडे म्हणाले, न्यायाला विलंब झाला याचा अर्थ कोणी कायदा हातात घ्यावा असा होत नाही. न्यायदानाला होणारा विलंब टाळणे आवश्यक आहे. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करून घेतला पाहिजे. न्यायप्रक्रियेला अनुरूप आर्टिफिशल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा विकास केला जाण्याची शक्यता आहे. अर्थात हे तंत्रज्ञान न्यायाधीशांची जागा कधीही घेऊ शकत नाही. न्यायमूर्ती बोबडे पुढे म्हणाले, आर्टिफिशल इंटेलिजन्स तंत्रज्ञानावर अनेक वेळा न्यायमूर्तींनीही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांना सांगू इच्छितो की, केवळ न्यायप्रक्रियेतील गणिती वा यांत्रिक भाग आणि समान प्रक्रिया करताना होणारा विलंब टाळण्यासाठी याचा वापर शक्य आहे.

माजी सरन्यायाधीशांना चिंता
सरन्यायाधीश शरद बोबडे आर्टिफिशल इंटेलिजन्सचे समर्थन करीत आहेत. मात्र माजी सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांनी न्यायालयाच्या कामकाजात आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या वापरावर चिंता व्यक्त केली होती. या तंत्रज्ञानाच्या दोन्ही बाजूंचा विचार करावा, असे अपील लोढा यांनी बोबडे यांना केले आहे.