
सामना ऑनलाईन । उल्हासनगर
उद्योगनगरी व व्यापाऱयांचे शहर म्हणून उल्हासनगरची ओळख आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नोटबंदी व जीएसटीमुळे या शहरासह संपूर्ण देशाचे कंबरडेच मोडले असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. अनेकांचा रोजगार बुडाला असल्याचेही त्यांनी सांगितले.
कल्याण लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्या प्रचारासाठी गोल मैदान येथे मंगळवारी आयोजित केलेल्या जाहीर सभेत पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, मोदींचे राज्य हे लोकशाहीला हानीकारक असून यावेळच्या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान मोदी हे जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करतात, पण याच नेहरूंनी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कारखाने आणले. इंदिरा गांधींनी पाकिस्तानला नमवले, राजीव गांधी यांनी संगणक, मोबाईल तंत्रज्ञान आणले. पण मोदींनी मात्र नोटाबंदी करून देशाची वाट लावली असल्याचा आरोप पवार यांनी केला.



























































