केंद्रात सत्ता असताना दिल्लीही सांभाळता येत नाही; शरद पवार यांची मोदी सरकारवर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सत्ता हातात आल्यानंतर त्याचा उपयोग समाजात एकवाक्यता कशी राहील, लोकांचे दुखणे कसे कमी होईल, देश एकसंध कसा राहील, देशातील सर्वजण एकत्र कसे राहतील ही जबाबदारी कोणत्याही राष्ट्रीय नेत्यांची, त्या सरकारची, त्या राष्ट्रप्रमुखांची असते. पण आज वेगळे चित्र आहे. येथे माणसामाणसांत अंतर पाडले जात असल्याची चिंता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली. अशा प्रकारे लोकशाही धोक्यात आणणाऱयांचा सर्वांनी विचार करण्याची गरज आहे. शिवाय आज हे आपल्यासमोर एक आव्हान असल्याचेही शरद पवार यांनी निदर्शनास आणले.

तपोवन मैदानात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संकल्प यात्रा सभेत ते बोलत होते. काही दिवसांपूर्वी देशाची राजधानी दिल्लीच्या काही भागांत संघर्ष, हल्ले, जाळपोळीच्या घटना घडल्या. केजरीवाल यांच्या हातात दिल्लीची सत्ता असली तरी दिल्लीचे गृहखाते हे भाजपच्या म्हणजे अमित शहा यांच्या हातात आहे. ही देशाची राजधानी एकसंध कशी राहील याची जबाबदारी त्यांची होती, पण याची त्यांनी खबरदारी घेतली नाही. पण दिल्लीत काय घडते याचा संदेश जगात जातो. यातून जगात या देशाची ही स्थिती समोर आली. त्यामुळे आज तुमच्या हातात सत्ता आहे, पण तुम्हाला दिल्ली सांभाळता येत नसल्याची टीका शरद पवार यांनी केली.

आपल्या या देशात जगातील अनेक नेते येतात

जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंह राव, मनमोहन सिंग यांचा कार्यकाल आपण पाहिला. यावेळी जगातील आलेले अनेक नेते दिल्लीसह देशाच्या अनेक भागांत गेले. पण अलीकडे चित्र वेगळे आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आले… गुजरातला गेले, चीनचे आले… गुजरातला गेले. दोन दिवसांपूर्वी ब्रिटनचे प्रधानमंत्री आले… तेही गुजरातला गेले. गुजरातबद्दल यत्किंचितही वेगळी भावना नाही; पण देशाची सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांना देशाच्या सर्व प्रांतांकडे लक्ष देण्याची भूमिका घ्यावी लागते. जसे एखादा मुख्यमंत्री एखाद्या गावात आला तर त्यानिमित्ताने तेथील विकासकामे होतात. पण एकाच ठिकाणी नेत्यांना घेऊन जाण्याचा प्रकार म्हणजे सबंध देशाविषयी तुमच्या मनात काय भावना आहे हे दिसून येते आणि असा संकुचित विचार देशाच्या हिताचा नसल्याचे सांगत शरद पवार यांनी मोदी सरकारला सुनावले.

त्यांना महाराष्ट्र कधी समजलाच नाही…

शिवछत्रपतींचे नाव तुमच्या आमच्या अंतःकरणात असल्याचे सांगून, आपण फुले-शाहू-आंबेडकर यांचे नाव घेतो का, असा प्रश्न विचारणाऱयांना महाराष्ट्र कधी समजलाच नसल्याची सूचक टीका त्यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता केली.

कोण कुठे तरी जाणार होते?

शाहूंच्या कोल्हापूरच्या भूमीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या विजयावरून कोल्हापूरकरांचे आभार व्यक्त करताना शरद पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही चिमटा काढला. पराभव झाल्यानंतर कोण कुठे जाणार होता, असे प्रश्न विचारताच उपस्थित कार्यकर्त्यांनी ‘हिमालयात’ असे सांगताच शरद पवार यांना हसू आवरले नाही.