बघा, उदाहरणातून तुम्हाला प्रेरणा घेता आली तर! दोन मंत्र्यांच्या राजीनाम्याचा दाखला देत शरद पवारांचे सत्ताधाऱ्यांना चिमटे

जालन्यात मराठा आंदोलकांवर अमानुषपणे लाठीमार करणाऱ्या मिंधे सरकारने आज हात वर केले. लाठीमाराचे आदेश सरकारने दिलेच नव्हते असे सांगत या प्रकरणी पोलिसांना बळीचा बकरा बनवण्यात आले आहे. मराठा समाजाचा संताप टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री व गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेत लाठीमाराबद्दल मराठा समाजाची माफी मागितली. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी मराठा समाजाचे आंदोलक आणि विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यावर भाजपकडून जुन्या प्रकरणांचा हवाला देण्याचे काम सुरू झाले आहे. गोवारी समाजाच्या मोर्चादरम्यान झालेल्या दुर्घटनेत 113 जणांचा मृत्यू झाला होता. तेव्हा कोणी राजीनामा दिला नव्हता असा आरोप फडणवीसांनी केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी या आरोपांचा नीट पद्धतीने समाचार घेतला.

शरद पवार यांनी जळगावमधील जाहीर सभेपूर्वी एक पत्रकार परिषद घेतली. यामध्ये बोलताना ते म्हणाले की, ‘गोवारींवर लाठीहल्ला नव्हता, तिथे चेंगराचेंगरी झाली होती. या घटनेनंतर त्या खात्याचे मंत्री मधुकर पिचड यांनी ताबडतोब राजीनामा दिला होता. यानंतर मुंबईतील घटनेनंतर गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी राजीनामा दिला होता. पूर्वीच्या या दोन उदाहरणातून तुम्ही प्रेरणा घेतली तर त्याबाबत विचार करावा.’ एक देश एक निवडणुकीवर चर्चा, विशेष अधिवेशन हे सगळे प्रकार देशातील महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचे पवार यांनी म्हटले.

जी20 बैठकीसाठी येणाऱ्या विविध देशांच्या राष्ट्राध्यक्ष, प्रमुख नेत्यांसाठी 9 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती भवनात विशेष भोजनाचे आयोजन केले आहे. यासाठीच्या निमंत्रण पत्रिकेत ‘इंडिया’ शब्दाऐवजी ‘भारत’ शब्दाचा वापर करण्यात आला आहे. ‘इंडिया’ आघाडीच्या दहशतीमुळे केंद्र सरकारने इंडिया शब्दाचा वापर थांबवल्याचा आरोप केला जात आहे. याबाबत प्रश्न विचारला असता पवार यांनी म्हटले की, हे नाव कोणी हटवू शकणार नाही. देशाशी निगडीत असलेल्या नावाबाबतची अस्वस्थता सत्ताधारी पक्षाच्या लोकांमध्ये का निर्माण होते हे कळत नाही.