
एकनाथ खडसे यांचे काम आणि त्यांच्या कर्तृत्वाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, परंतु काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. अतिवृष्टीमुळे शेतकर्यांच्या पीकांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यानिमित्ताने पवार मराठवाडा दौर्यावर आहेत. दौर्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.
भाजप नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेणार अशी गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे, त्यावर शरद पवार म्हणाले की “एकनाथ खडसे हे मोठे नेते आहेत, विरोधीपक्षनेतेपद, अर्थमंत्रीपद त्यांनी भुषवले आहे, आमच्यावरही त्यांनी टीका केली आहे. असे असली तरी त्यांचे काम आणि कर्तुत्व नाकारता येणार नाही. त्यांच्या पक्षाने त्यांच्या कामाची नोंद घेतली नाही असे त्यांना वाटत असेल.” पण जिथे आपली नोंद घेतली जाईल अशा तिथे जावं असा विचार येणे सहजिक आहे. असे असले तरी काय निर्णय घ्यावा हा सर्वस्वी निर्णय खडसे यांचा आहे असे पवार म्हणाले.





























































