शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट, विविध विषयांवर चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘सह्याद्री’ अतिथीगृहावर शेतीविषयक बैठक पार पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उभयतांमध्ये दोन तासांहून अधिक काळ विविध विषयांवर चर्चा झाली. 19 जुलैपासून सुरू होणाऱया संसदीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

शरद पवार हे राज्यातील विविध विषयांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सल्लामसलत करीत असतात. आजही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन राज्यातील विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.

चर्चेचे विषय

राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात मराठा आरक्षण, ओबीसींचे राजकीय आरक्षण, कैकाडी समाजाचे आरक्षण तसेच कृषी कायद्यांसदर्भात ठराव करून केंद्र सरकारकडे याविषयी मागणी केली आहे. 19 जुलैपासून सुरू होणाऱया संसदीय अधिवेशनात या ठरावांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या खासदारांनी मुद्दे उपस्थित करून केंद्राकडे मागणी करावी. त्याचप्रमाणे राज्यातील जनतेच्या हिताच्या मुद्यांवर संसदेत भूमिका मांडावी यासंदर्भात शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याचे समजते.

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या काळात उत्तम काम केलं आहे. एका वडिलांप्रमाणे त्यांनी भूमिका निभावली आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले असून त्यांनी देशात पहिला क्रमांक पटकावला आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या एका बैठकीत काैतुक केले.

विधानसभाध्यक्षांची निवड

विधानसभा अध्यक्षांची निवड तसेच सरकारने विधिमंडळ अधिवेशनादरम्यान मांडलेल्या कृषी विधेयकात शेतकऱयांच्या हितासंदर्भात कोणत्या बाबींचा समावेश करता येईल, याबाबतही उभयतांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.