
कोरोनाच्या या संकटकाळातही सरकारचे उत्तम चालले आहे, असे स्पष्ट करताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळपासून संध्याकाळपर्यंत या कोरोनाच्या संकटावर मात करण्याच्या कामात व्यस्त असतात, असे सांगत त्यांचे कौतुक केले. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत उद्योग पूर्ववत कसे करायचे, अर्थव्यवस्था पूर्वपदावर कशी आणायची, यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
संभाजीनगरात आज शनिवारी कोरोनासंदर्भात आढावा बैठक पार पडली. बैठकीसाठी ते आले होते. या बैठकीला पालकमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री राजेश टोपे, रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पालकमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती दिली. कोरोनासंदर्भात काही प्रश्न केंद्र सरकारकडे मांडावे लागणार असल्याने पालकमंत्री सुभाष देसाई यांनी बोलावलेल्या या आढावा बैठकीला आम्ही खासदार उपस्थित आहोत, असे शरद पवार यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले. ते म्हणाले, कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्रित आले पाहिजे, राज्यातील संभाजीनगरसह काही शहरांत काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे. तज्ज्ञांच्या मते ऑगस्टमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ही शक्यता पाहता बेडची संख्या वाढविण्याची गरज आहे, अशी परिस्थिती उद्भवल्यास खासगी डॉक्टरांचे सहकार्य घ्यावे लागणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
केंद्र सरकारने दिलेल्या पॅकेजचा लाभ राज्याला मिळाला असे दिसत नाही. मात्र, राज्य सरकारचा उद्योग आणि अर्थव्यवस्था पूर्ववत करणे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लॉकडाऊननंतर कामगार बाहेर निघून गेले. त्यामुळे औद्योगिक वसाहतीत केवळ 32 टक्के कामगार आहेत. त्यांची संख्या 100 टक्के कशी करता येईल, यासाठी सरकारकडून जोमाने प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात नवीन 500 रुग्णवाहिका सेवेत आणल्या जाणार असल्याची माहिती देत कोरोना चाचणीत मनपाने उच्चांक केल्याचे सांगितले. मनपाने तब्बल १ लाख चाचण्या केल्या आहेत. संभाजीनगरचा डबलिंग रेट कमी झाला आहे. पूर्वी कोरोना रुग्ण 14 दिवसांत दुप्पट होत होते. आता यासाठी २६ दिवस लागत आहेत. शहरात ह्युमन अॅण्ड चॉईल्ड हॉस्पिटलला लवकरच प्रशासकीय मान्यता दिली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.



























































