बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवरा! शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन, पडळकरांच्या विधानाचा केला निषेध

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर अर्वाच्य भाषेत टीका केली होती. याचा सर्व स्तरातून निषेध होत असून याच संदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याचे वृत्त आहे. शरद पवार यांनी पडळकरांच्या विधानाचा निषेध व्यक्त करत अशी गलिच्छ टीका योग्य नाही, असे म्हटले. तसेच बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवरण्याची मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

सांगली जिल्ह्यातील जत येथे अभियंता आत्महत्या प्रकरणावरून काढण्यात आलेल्या निषेधार्थ मोर्चावेळी गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्या वडिलांचा उल्लेख करत त्यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. ‘अरे जयंत पाटला, तुझ्यासारखी भिकारी औलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्यात धमक आहे, कार्यक्रम करायची. तुझ्यासारखी मी औलाद नाही. तू राजाराम पाटलाने काढलेली औलाद मला अजिबात वाटत नाही. काहीतरी गडबड असणार आहे’, असे गलिच्छ विधान पडळकर यांनी केले होते.

गोपीचंद पडळकर यांच्या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने निषेध केला आहे. जतमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही याबाबत भाष्य केले आहे. अशी विधानं वेदना देणारी असतात. त्या त्या पक्षाच्या नेत्यांनी अशा विधानांसंदर्भात नोंद घेऊन भूमिका स्पष्ट करायला हवी, असे अजित पवार म्हणाले.

गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर अर्वाच्य भाषेत टीका; अजित पवारांनी टोचले कान, फडणवीसांचे नाव घेत म्हणाले…