
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोखायचे असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हाच योग्य पर्याय असेल, असे देशातील अनेक प्रादेशिक पक्षांचे मत आहे. त्यातूनच यूपीएची पुनर्बांधणी करून त्यांचे नेतृत्व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे दिले जावे, अशी मागणी होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज परत एकदा महत्त्वाचे मत नोंदवले. पवार दोन दिवसांच्या बंगळुरू दौऱयावर असून आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी राष्ट्रीय पातळीवर भाजपविरोधी आघाडी उभारण्यासाठी लवकरच पावले टाकली जातील, असे स्पष्ट संकेत दिले.
‘भाजपच्या विरोधातील पक्षांची मोट बांधण्यासाठी बैठक घ्यावी, अशी इच्छा अनेक नेत्यांनी व्यक्त केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तर आम्हाला तसे लेखी कळवले आहे. याचा पुढाकार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मी घ्यावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यावर आम्ही विचार करत आहोत. इतर नेत्यांशी बोलून आम्ही अंतिम निर्णय घेऊ. मात्र याची कोणतीही तारीख अद्याप ठरलेली नाही’, असे पवार यांनी नमूद केले.
महागाईबाबत जनमत तयार करावे लागेल
‘आज देशात जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप आणि त्यांच्या सहकाऱयांकडून केला जात आहे. तो प्रयत्न हाणून पाडण्याची गरज आहे. त्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याची व समभाव कसा राहील हे पाहण्याची आवश्यकता आहे’, असे पवार यांनी सांगितले. पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल यांच्या किमती वाढत आहेत. त्या सामान्य माणसाला त्रासदायक आहेत. आज त्याही प्रश्नावर जनमत तयार करावे लागणार असून त्यासाठी विरोधकांचे ऐक्य महत्त्वाचे ठरणार आहे, असे पवार म्हणाले.


























































