
शेअर बाजाराची सुरुवात मंगळवारी तेजीने झाली. 228 अंकांची वाढ नोंदवत निर्देशांक 38,895 वर पोहचला होता. मात्र, दुपारी दोन वाजेनंतर बँकिंग सेक्टरचे शेअर ढेपाळल्याने निर्देशांक 920 अंकांनी कोसळला. सोमवारी बाजार बंद होण्याच्या वेळेपेक्षा 690 अकांनी बाजार कोसळला होता.
बँकिंग सेक्टरमधील शेअरमध्ये यस बँकेचे शेअर मंगळवारी निचांकी स्तरावर होते. त्यांचा दर 29.05 वर पोहचला होता. त्यामुळे बाजाराचे सुमारे 8 हजार कोटींचे नुकसान झाले. दिवसभरात या बँकेचे शेअर 30 टक्क्यांपर्यंत खाली आले होते. आरबीएल बँकेचे शेअर 20 टक्क्यांनी खाली आले. यस बँकेने इंडिया बुल्सला मोठ्या प्रमाणात कर्ज दिल्याचे वृत्त आल्याने या बँकेचे शेअर कोसळले. मात्र, बँकेकडून या वृत्ताचे खंडन करण्यात आले आहे. मार्केट कॅपच्या हिशोबाने निफ्टीमध्ये या बँकेचे शेअर कमकुवत झाले आहेत. या शेअरमध्ये महिन्याभरात 31, तीन महिन्यात 62, 6 महिन्यात 86 तर वर्षभरात 77 टक्क्यांनी घट झाली आहे.
बाजाराची सुरुवात झाल्यावर निफ्टी सकाळी11,500 अंकांवर पोहचला होता. भारत पेट्रोलियमच्या (बीपीसीएल) शेअरमध्ये 7 टक्क्यांनी वाढ दिसून आली. बीपीसीएल आपले शेअर विकून यातून बाहेर पडणार असल्याच्या वृत्ताने या शेअरमध्ये तेजी दिसून आली. बाजार सुरू झाला तेव्हा 460 शेअरमध्ये तेजी आणि 203 शेअरमध्ये मंदी दिसून आली. कॉनकोर, एससीआय, बर्जर पेन्ट, बीपीसीएल, आयओसी, इंडसइंड बँक, हिरो मोटोकॉर्प, टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स या शेअरमध्ये तेजी होती. तर डीआरडीएल, सिप्ला, रिलयन्स कॅपिटल, अशोक लिलँड, वोडाफोन, आयडिया आणि डीएचएफएल या शेअरमध्ये घट दिसून आली. ऑटो, इन्फ्रा, एफएमसीजी, फार्मा,एनर्जी, आयटी आणि मेटल सेक्टरमध्ये तेजी होती. बाजारात सोमवारी निर्देशांक 155.24 अंकानी घसरून 38,667.33 तर निफ्टी 35.15 अंकांनी घसरून 11,477.25 वर बंद झाला होता. तर मंगळवारी बाजारात 920 अंकांनी घट झाली.



























































