इस्रायल इराण संघर्षाचा गुंतवणूकदारांना फटका, अवघ्या 5 मिनिटांत 8 लाख कोटींचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आज सकाळी शेअर बाजार उघडल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच मोठी घसरण झाली आणि गुंतवणूकदारांना प्रचंड फटका बसला. अवघ्या 5 मिनिटांत दलाल स्ट्रीटवर असा मोठा धक्का बसला की गुंतवणूकदारांच्या सुमारे 8 लाख कोटी रुपये बुडाले.

या घसरणीमागे इराण आणि अमेरिकेमधील वाढलेला भू-राजकीय तणाव कारणीभूत ठरला आहे. या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली असून ब्रेंट क्रूडने 112 डॉलर प्रति बॅरलचा स्तर ओलांडला आहे. याचा थेट परिणाम जागतिक बाजारांवर झाला आणि त्याचे पडसाद भारतीय शेअर बाजारात उमटले.

जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या भीतीमुळे मोठ्या प्रमाणात विक्री सुरू झाली. या जागतिक विक्रीचा परिणाम म्हणून भारतीय बाजारातही मोठी घसरण पाहायला मिळाली. विशेषतः सेन्सेक्सच्या वीकली एक्सपायरीच्या दिवशी निफ्टीतील सर्वच क्षेत्रांमध्ये मोठी घसरण झाली.

आकडेवारीनुसार, बीएसई सेंसेक्स सुमारे 1800 अंकांनी (2.35%) कोसळत 74,869 या पातळीवर आला. तर निफ्टी 50 निर्देशांक 532 अंकांनी (2.23%) घसरत 23,238 या स्तरावर पोहोचला. विशेष म्हणजे, याच्या आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी बाजारात तेजी होती. त्या दिवशी सेंसेक्स 633 अंकांनी वाढून 76,704 वर बंद झाला होता, तर निफ्टी 196 अंकांनी वाढून 23,777 या पातळीवर होता. मात्र, आजच्या घसरणीमुळे कालची सर्व कमाई पुसली गेली.

मोठ्या कंपन्यांच्या शेअर्ससोबतच मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही मोठ्या प्रमाणात विक्री झाली. सेन्सेक्समधील सर्व 30 प्रमुख शेअर्स लाल निशाणावर व्यवहार करत होते. बँकिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला असून एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक आणि लार्सन अँड टुब्रो (एलअँडटी) यांसारख्या मोठ्या कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले.

आज व्यवहारात असलेल्या 2006 शेअर्सपैकी 1390 शेअर्स घसरले, तर केवळ 469 शेअर्स वाढीसह व्यवहार करत होते. 147 शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही. याशिवाय 12 शेअर्सनी एका वर्षातील उच्चांक गाठला, तर 40 शेअर्स एका वर्षातील नीचांकी पातळीवर आले.

एकूणच, जागतिक तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे भारतीय शेअर बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली असून गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे.