
अनलॉक 2.0 ची घोषणा झाल्यानंतर शेअर बाजारावरही त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी बाजार सुरू होताच निर्देशाकांने वाढ नोंदवली. त्यामुळे मंगळवारी शेअर बाजाराने उसळी घेतल्याचे दिसून आले. कोरोनाचे जागतिक संकट, लॉकडाऊन, आंतरराष्ट्रीय बाजार या सर्वांच्या परिणाममुळे तीन महिन्यांपासून बाजारात फारशी हालचाल दिसत नव्हती. मात्र, आता अनलॉक 2.0 घोषणा झाल्याने त्याचे बाजारावर सकारात्मक परिणाम दिसत आहेत.
बाजाराची सुरुवात होताच मंगळवारी सर्वच शेअर तेजीत होते. त्यामुळे बाजाराने उसळी घेतली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने 179.57 अंकांची वाढ नोंदवत बाजार 35141.09 वर सुरू झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीनेही 74.75 अंकांची वाढ नोंदवत 10387.15 वर सुरू झाला. टीसीएस आणि एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, मारुती, हिंडाल्को, ब्रिटानिया, ग्रासिम, टेक महिंद्रा, कोटक बँक, टाटा मोटर्स आणि एनटीपीसीच्या शेअरमध्येही तेजी दिसून आली. विशेष म्हणजे आज सर्व सेक्टर हिरव्या रंगात म्हणजेच तेजीत असल्याचे दिसत होते.
आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि इतर देशांच्य बाजाराचा परिणामामुळे सोमवारी बाजाराची सुरुवात मंदीत झाली होती. मुंबई बाजाराचा सेन्सेक्स 268 अंक घसरून 34903.27 अंकावर सुरू झाला होता. तर निफ्टीमध्ये 91.50 अंकांची घसरण होऊन बाजार 10291.50 वर सुरू झाला होता. तसेच सोमवारी बाजार मंदीतच बंद झाला होता. सेन्सेक्समध्ये 209.75 अंकांची घसरण होऊन 34961.52 वर बंद झाला होता. तर निफ्टी 70.60 अंकांनी घसरून 10312.40 अंकांवर बंद झाला होता. मात्र, मंगळवारी बाजाराने उसळी घेतल्याने तेजीचे वातावरण दिसत आहे.

























































