
मंदीच्या माऱयाने कोलमडलेल्या शेअर बाजाराला मंगळवारी भाऊबीजेच्या मुहूर्तावर जणू तेजीने ओवाळणी केली. जागतिक पातळीवरच्या व्यापारातील सकारात्मक घडामोडी तसेच कंपन्यांची दुसऱया तिमाहीत अपेक्षेपेक्षा अधिक झालेली भरभराट याचे पडसाद शेअर बाजारात उमटले. त्यामुळे सेन्सेक्सने तब्बल 581 अंकांची उसळी घेतली.
बाजाराला चालना देण्यासाठी सरकारने विविध उपाययोजना आखल्या आहेत. त्यामुळे व्यापारी क्षेत्राच्या आशा आणखी बळकट होऊन मंगळवारी 30 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ नोंद झाली. परिणामी सेन्सेक्सने 39,831.84ची पातळी गाठली, तर निफ्टीने 159.70 अंकांच्या तेजीसह 11,786.85वर झेप घेतली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नियोजित वेळेच्या आधीच चीनबरोबर व्यापारविषयक महत्त्वपूर्ण बोलणी करणार असल्याचे सोमवारी जाहीर केले. तसेच चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱया तिमाहीत कंपन्यांची आर्थिक स्थिती सुधारली आहे. या सकारात्मक घडामोडींचा प्रभाव मंगळवारी शेअर बाजारात दिसून आला.
कररचनेत पुन्हा बदल होणार
सरकार पुन्हा एकदा करकपातीची ‘गूड न्यूज’ देणार असल्याच्या शक्यतेने शेअर बाजारात तेजीचे वातावरण आणले. लाँग टर्म कॅपिटल गॅस, सिक्युरिटी ट्रान्झेक्शन टॅक्स, डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्सच्या रचनेत बदल करण्याचा सरकारचा विचार आहे. यासंदर्भात फेब्रुवारीच्या बजेटमध्ये किंवा त्याआधीच घोषणा केली जाणार आहे.
या कंपन्यांचे शेअर्स वधारले
मुंबई शेअर बाजारात टाटा मोटर्स डीव्हीआर, टाटा मोटर्स, टाटा स्टील, येस बँक, ऍक्सिस बँक यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसली. दुसरीकडे नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्येही टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 16.55 टक्क्यांची तेजी संचारली. त्याचबरोबर जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, येस बँक आणि मारुती या कंपन्यांचे शेअर्स वधारले.



























































