शिरीषायन – मोठ्यांच्या छोट्या गोष्टी : 18

>> शिरीष कणेकर

का कुणास ठाऊक, आज सकाळपासून मला ‘र्‍हिदम किंग’ ओ.पी. नय्यर आठवतोय. न आठवाव्यात अशा गोष्टी आठवण्यापेक्षा ओ.पी. आठवलेला काय वाईट? थोडा आयुष्याचा ताल सापडलाय असं वाटेल. तो इतका टाइट कपडे घालायचा की, त्यात कसा शिरला असेल हा प्रश्न पडायचा. एक गोष्ट मात्र नक्की, प्रत्येक भेटीत तो एक प्रश्न न चुकता हमखास छद्मीपणे विचारायचा, ‘क्या कहेती है वो पेडर रोड की दो महारानीयाँ?’ लगेच चपापून जीभ चावत म्हणायचा, ‘यार, कहीं लिखना नहीं. खामखा लफडा हो जायेगा.’

‘नया दौर’चं संगीत ऐकून दिलीप कुमार त्याला म्हणाला होता, ‘फालतू आहे.’

दिलीप कुमारचे उद्गार ऐकून ओ.पी.चं माथं भडकलं. (आपलं नसतं भडकलं? आणि ही दिलीप कुमारची संगीतातली जाणकारी वाटतं?) तो तडकून दिलीप कुमारला तोंडावर म्हणाला, ‘तू अपना काम देख. तुझसे तो कामरान अच्छा है.’

‘नया दौर’नंतर ओ.पी. व दिलीप कुमार पुन्हा एकत्र आले नाहीत यात नवल ते काय?

‘कामरान कोण?’ मी मुद्दामच पेडगावला जात ओ.पी.ला विचारले.

‘वो ‘सी’ ग्रेड पिक्चर का हीरो हुवा करता था. साजिद खान और फराह खान का बाप.’ ओ. पी. तिरस्कारानं म्हणाला.

‘लेकिन ‘जासूस’ में अनिल विश्वास का तलत ने गाया हुआ ‘जीवन है मधुबन परदे पर कामरान ने गाया था.’ मी माझं ज्ञान पाजळलं. क्षणापूर्वी मी कामरान कोण हे विचारत होतो.

अनिल विश्वासच्या उल्लेखाबरोबर ओ.पी.नं कानाच्या पाळय़ा पकडल्या. सज्जाद म्हटल्यावर तो उभा राहून स्वतःच्या तोंडात मारून घेतल्यासारखा करायचा. सज्जाद राहायचा त्या माहीमच्या घाणेरड्या चाळीत त्याहून गलिच्छ अशा ‘कॉरिडॉर’मध्ये ओ.पी.नं त्याच्या पांढऱयाशुभ्र कपडय़ांनिशी माझ्या समक्ष सज्जादच्या पायांवर लोटांगण घातलं होतं.

हाच ओ.पी. ‘नया दौर’ बघितल्यावर निर्माता-दिग्दर्शक बी. आर. चोप्रा याला म्हणाला होता- ‘इसमें ‘नया दौर’ कहाँ है? ये तो सिर्फ ‘नय्यर दौर’ है.’ यानंतर चोप्राबरोबरचे त्याचे बंधही कापले गेले.

आशा भोसले ओ.पीं.ची प्रमुख गायिका झाल्यावर एकदा गीता दत्त विषण्णपणे ओ.पी.ला म्हणाली, ‘आप तो हमे भूल गये, नय्यरसाब.’ ओ.पी.ला ही गोष्ट अखेरपर्यंत लागून राहिली होती. शेवटी धमाल कारकीर्दीची सुरुवातच ओ.पी.नं गीताच्या आवाजात ‘देखो जादूभरे मोरे नैन’ या गाण्यानं केली होती. आपल्याला शास्त्राsक्त संगीताचा गंधही नाही हे तो छातीठोकपणे शपथेवर सांगायचा. ‘फागुन’मधली सगळी गाणी त्यानं पिलू रागात कशी दिली याचं उत्तर मात्र त्याच्याजवळ नव्हतं.

‘चैन से हमको कभी आपने जीने न दिया’ (प्राण जाये पर वचन न जाये) या आशानं अप्रतिम गायलेल्या ओ.पी.च्या गाण्याला त्या वर्षीचं ‘फिल्मफेअर’ पारितोषिक मिळाले. दरम्यान, ओ.पी.शी पूर्णपणे फाटल्यामुळे आशा पारितोषिक स्वीकारायला कार्यक्रमाला गेली नाही. ओ.पी. गेला. पारितोषिकाची मानाची बाहुली त्यानं परतताना वाटेत हाजीअलीजवळ समुद्रात फेकून दिली. (मला ती जागा त्यानं नेऊन दाखवली) काय ही खुन्नस अन् स्वतःच्याच गाण्यावर! ओ.पी.ची आणि आशाचीही.

कारकीर्दीच्या अखेरीस त्यानं ‘हीरा मोती’मध्ये दिलराज कौर व महंमद रफी यांचा एक भांगडा केला. तो मला ऐकवून ओ.पी. विजयी सुरात म्हणाला, ‘देखो, इसके सामने ‘काश्मिर की कली’ का भांगडा कुछ भी नहीं.’

कुछ भी नहीं? माझ्या तोंडातले शब्दच हरवले. जीभ त्यांना शोधत बसली. ‘हीरा मोती’मधला भांगडा आला आणि गेला. ‘काश्मिर की कली’मधला भांगडा आजही तेवढाच ताजा व टवटवीत आहे. ओ.पी.ला हे कळत नव्हतं असं नाही; पण त्याला आता नव्यानं कौतुक व लोकप्रियता हवी होती. पण ते यश त्याच्या भाळी नव्हतं. मनाविरुद्ध तो आपल्याच ‘काश्मिर की कली’मधल्या भांगड्याचा दुस्वास करीत होता. नियती तुझे खेळ निराळे!

अखेरच्या गुमनामीच्या वाईट दिवसात ओ.पी. म्हणे कुटुंबाला घराबाहेर काढायला निघाला होता, पण त्यालाच बाहेर पडावं लागलं. मध्ये दहिसरला एका गायिकेसमवेत राहत होता. शेवटी त्याच्या संगीतावर अपार प्रेम करणाऱया नाखवा नामे कुटुंबानं ठाण्यात त्यांच्या घरात त्याला एक खोली दिली होती. त्या खोलीत टी.व्ही., रेडिओ, टेपरेकॉर्डर काही नव्हतं. कोणाला भेटायलाही तो अनुत्सुक असायचा. जणू तो स्वतःपासूनच पळत होता, स्वतःपासूनच लपत होता.

त्याच्या अंत्यसंस्काराला बोलावणं पाठवूनही त्याची बायकामुलं आली नाहीत. आशा येण्याचा प्रश्नच नव्हता.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या