मोदी म्हणजे शंकराच्या पिंडीवरील विंचू,संघाच्या हवाल्याने शशी थरूर यांचा डंख

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, बंगळुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदी शंकराच्या पिंडीवर बसलेल्या विंचवासारखे आहेत. त्याला तुम्ही हाताने हटवू शकत नाही आणि चप्पलने मारू शकत नाही. हाताने हटवायला गेलात तर तुम्हाला डंख करेल, असे खळबळजनक वक्तव्य करीत काँग्रेस नेते शशी थरूर यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. आपल्या पुस्तकात छापलेले मोदींबाबतचे भाष्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका सदस्यानेच पत्रकारांसमोर त्याचे नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर केल्याचा दावाही त्यांनी केला.

‘द पॅराडॉक्सिकल प्राइम मिनिस्टर’ या त्यांच्या पुस्तकासंदर्भात सध्या चर्चा सुरू आहे. बंगळुरूमधील लिट फेस्टमध्ये शशी थरूर यांनी भाग घेतला होता. यावेळी ‘द पॅराडॉक्सिकल प्राईम मिनिस्टर’ या त्यांच्या पुस्तकातील काही पानांचे त्यांनी वाचन केले. थरूर म्हणाले, आरएसएसच्या निनावी सूत्राने पत्रकारांना मोदींबाबत सांगितले होते. त्याचा उल्लेख मी पुस्तकात केला आहे. ते म्हणाले, ‘मोदीत्व’, ‘मोदी प्लस हिंदुत्व’ या घोषणांमुळे मोदी संघापेक्षाही वरच्या स्थानी आहेत असा प्रचार त्यांचे समर्थक करीत असल्याची खंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका सदस्याने आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर पत्रकारांसमोर व्यक्त केली होती. तोच उल्लेख माझ्या पुस्तकात आहे.

याआधीही शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे. थिरुवनंतपुरममध्ये आयोजित ‘नफरत के खिलाफ-वर्तमान हिंदुस्थानमे हिंसा और असहनशीलता’ कार्यक्रमात शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावेळी शशी थरूर यांनी म्हटले होते की, नरेंद्र मोदी यांना वेगवेगळे कपडे परिधान केलेले बघितले आहे, पण ते कधीही मुस्लिम टोपी घालत नाहीत.

थरूर यांनी माफी मागावी – भाजप

शशी थरूर यांनी पंतप्रधानपदावरील व्यक्तीबाबत केलेले विधान अशोभनीयच आहे. थरूर यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अनुमतीनेच मोदींवर बेताल टीका केली आहे का, असा सवाल करीत भाजपचे राज्यसभा खासदार राकेश सिन्हा यांनी थरूर यांनी आपल्या वक्त्यव्याबद्दल जाहीर माफी मागावी अशी मागणी केली.