
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी स्वपक्षीयांवर जोरदार हल्ला चढवला आहे. मणिशंकर अय्यर यांनी शशी थरूर, पवन खेडा आणि जयराम रमेश यांच्यावर टीका केली आहे. शशी थरूर यांना पुढील परराष्ट्र मंत्री व्हायची स्वप्ने पडत आहेत, असा हल्लाबोल करत मणिशंकर यांनी काँग्रेस केरळमध्ये कधीही निवडणूक जिंकू शकणार नाही, असे भाकीतही वर्तवले. यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ‘एनडीटीव्ही‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
मणिशंकर अय्यर यांनी केरळमधील काँग्रेसच्या सद्य स्थितीवर भाष्य केले. काँग्रेस पक्ष केरळमध्ये विधानसभा निवडणूक जिंकू शकणार नाही, कारण पक्षातील नेते कम्युनिस्टांपेक्षा एकमेकांचा जास्त तिरस्कार करतात, असे ते म्हणाले. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी अय्यर यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्यावर केलेल्या स्तुतीसुमनांमुळे वाद निर्माण झाला होता. आता त्यांनी पुन्हा एकदा स्वपक्षीय नेत्यांवर टीका करून वाद ओढवून घेतला आहे.
दरम्यान, अय्यर यांचे विधान हे त्यांचे वैयक्तिक मत असून त्याचा पक्षाशी संबंध नसल्याचे काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते पवन खेडा यांनी स्पष्ट केले. याचाही अय्यर यांनी समाचार घेतला. अय्यर यांनी पवन खेडा हे कठपुतळी असल्याचे म्हटले. पवन खेडा गेल्या दोन वर्षांपासून माझ्यावर आरोप करत आहेत. जर काँग्रेसला त्यांच्याशिवाय दुसरा कोणताही प्रवक्ता मिळत नसेल, तर पक्षाची अवस्था अशीच राहणार, अशी टीका त्यांनी केली.
अय्यर यांनी खासदार शशी थरूर यांच्यावरही कडक शब्दांत टीका केली. थरूर हे हिंदुस्थान-पाकिस्तान शांततेच्या विरोधात असून त्यांना पुढचे परराष्ट्र मंत्री व्हायची स्वप्ने पडत आहेत, असे अय्यर म्हणाले. तसेच जयराम रमेश यांना फक्त आपली नोकरी वाचवण्यात रस आहे, अशी टीकाही त्यांनी केली.























































