खामोश! 2024 मध्ये ममता ‘गेम चेंजर’ होतील!!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर आसनसोल लोकसभा पोटनिवडणुकीत तीन लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवणारे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी रविवारी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाची भरभरून प्रशंसा केली. ममता बॅनर्जी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत ‘गेम चेंजर’ सिद्ध होतील, असा विश्वास शत्रुघ्न सिन्हा यांनी एका मुलाखतीत व्यक्त केला.

ममता बॅनर्जी यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे माझा आसनसोल लोकसभा पोटनिवडणुकीत विक्रमी मतांच्या फरकाने विजय झाला आहे, असे त्यांनी सांगितले. तृणमूल काँग्रेससोबत एक नवीन आणि सर्वोत्तम सुरुवात झाल्याने मी उत्साहित आहे. आता माझ्या राजकीय कारकीर्दीला योग्य दिशा मिळाली आहे, असे ते म्हणाले. भाजपने धनशक्ती आणि सत्तेचा दुरुपयोग केला. अशा परिस्थितीतही ममता बॅनर्जी यांचे सक्षम नेतृत्व आणि तृणमूल काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी घेतलेल्या अथक मेहनतीच्या जोरावर मी आसनसोल लोकसभा मतदारसंघात विक्रमी मताधिक्याने विजय मिळवू शकलो, असा दावा शत्रुघ्न सिन्हा यांनी केला. ‘शॉटगन सिन्हा’ या नावाने प्रसिद्ध असलेले शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपसोबत आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती, परंतु 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता त्यांनी तृणमूलच्या तिकिटावर आसनसोल लोकसभा पोटनिवडणूक लढवली.

भगवा ब्रिगेडकडून ‘धनशक्ती’चा वापर

सिन्हा यांनी भाजपवर जोरदार आरोप केला. भगवा ब्रिगेड ‘धनशक्ती’चा वापर करीत आहे. केंद्रात सरकार असल्यामुळे भाजप सत्तेचा गैरवापर करीत आहे. माझी भूमिका संपूर्ण देशभरात ममता बॅनर्जींचा संदेश घेऊन जाण्याची असेल. मी वेगवेगळय़ा पक्षांत राहूनही नेहमीच ममता बॅनर्जी यांच्याशी विचार शेअर केले, असेही सिन्हा यांनी नमूद केले.