
सामना प्रतिनिधी । पंढरपूर
देहु ते पंढरपुर असा आषाढी पायी वारीचा प्रवास असणारा जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे सोमवारी देहुच्या वाड्यातुन प्रस्थान होत आहे. या पालखी सोहळ्यात अश्वांच्या रिंगणासाठी मानाचा बाभुळकरांच्या अश्वाबरोबरच पताकाधारी अश्व सेवेचा मान लोकनेते स्व.प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी गेली 30 वर्षांपूर्वी सुरु केला आहे त्यांच्या पाश्चात डॉ. धवलसिंह मोहिते पाटील व त्यांच्या माता पद्मजादेवी मोहिते पाटील यांनी अश्वसेवा सुरुच ठेवली असून आषाढी वारीसाठी मोहिते पाटील यांचा शौर्य अश्वाची वर्षभर देखभाल अश्व प्रशिक्षक सोहेल खान हे पहात असतात.
वर्षभर शौर्यला हरभरा,गुळ, दुध,तुप,गव्हाचा भुस्सा असा खुराक दिला जातो. तर आषाढी वारीसाठी रवाना होण्यापुर्वी महिनाभर आधी खुराकाबरोबर शिजवलेली बाजरी, मल्टीव्हिटॅमिन, प्रोटीन,व कॅल्शियमयुक्त असे विशेष खाद्य दिले जाते. तसेच शौर्यची तेलाने मालिश करुन सर्वांग तगडे केले जाते. तर गोल रिगणाकरीता धावण्याची शिकवण ही दिली जाते.




























































