शिरीषायन – मोठय़ांच्या छोटय़ा गोष्टी

>>शिरीष कणेकर

चित्रगुप्ताचे पहारेकरी ओझरते दिसू लागले तशी तिन्हीसांजेला मला भेटलेली मोठी माणसं मला आठवायला लागली. करू सुरू? ही घ्या – लता मंगेशकर, आशा भोसले, सुनील गावसकर, जयवंत दळवी, व. पु. काळे, वि. आ. बुवा, इसाक मुजावर, तलत मेहमूद, मन्ना डे, विद्याधर गोखले, काशिनाथ घाणेकर, नाना पाटेकर, विक्रम गोखले, राजेश खन्ना, दिलीप वेंगसरकर, सरोजिनी बाबर, जयंतराव टिळक, शांताबाई शेळके, सुधीर फडके, श्रीनिवास खळे, देव आनंद, ओ. पी. नय्यर, सी. रामचंद्र, नौशाद, सज्जाद, जयदेव, कल्याणजीभाई, शम्मी कपूर, सुशीलकुमार शिंदे, बाळासाहेब ठाकरे… मी! शेवटच्या नामोल्लेखाने तुमच्या कपाळावर आठी पडली असेल, पण असं का? मी मोठा माणूस नाही की मी स्वतःला ओळखत नाही? चांगला ओळखून आहे बरं! गंमत अपार्ट, मी अनुभवलेले माझ्या परिचितांपैकी काहींचे दिलचस्प किस्से तुमच्या रंजनासाठी पाठवत आहे. एंजॉय…

माझ्या ‘यादों की बारात’ या पुस्तकाच्या प्रकाशनाची निमंत्रणे वाटत मी फिरत होतो. प्रत्येक घरी मी गेलो तर वेळ जाईल या विचारानं मी सोबत माझ्या मुलाला घेतलं होतं.

मी त्याला श्रीधर फडकेंकडे पत्रिका घेऊन पाठवले. परत येऊन तो म्हणाला, ‘ते घरी नव्हते. मी त्यांच्या वडिलांजवळ पत्रिका दिली व त्यांना म्हणालो, ‘तुम्ही आलात तरी चालेल.’

मी काही न बोलता सुमडीत स्कूटर चालू केली.

मुलाखत द्यायला दिलीप वेंगसरकर माझ्या घरी आला होता. माझा भाऊही उपस्थित होता. तो दिलीपला म्हणाला, ‘परवा रणजीत तुम्ही कसले धडाधड चौकार व षटकात मारलेत हो.’

दिलीप विनम्रपणे हसला.

त्यावर माझ्या भावाचा पुढला प्रश्न आला, ‘कसोटी सामन्यात तुम्हाला असं खेळता येत नाही का?’

दिलीपचा चेहरा बघायला लागू नये म्हणून मी मान फिरवली. कुठं बघावं व आपल्या चेहऱयाचं काय करावं, दोन्ही मला कळत नव्हतं. दिलीपच्या जागी मी नव्हतो ही देवाजीची कृपा.

मी मलबार हिलवर शम्मी कपूरच्या घरात गप्पा मारत बसलो होतो (मोठी माणसं – गप्पा आठवतंय नं?). ‘शक्ती’चा विषय निघाला. शम्मी म्हणाला, ‘अभूतपूर्व द्वंद्व, अभिनयातील अतुलनीय जुगलबंदी बघायला मिळेल अशी आमची अपेक्षा होती, पण फुस्स! कुठलं काय नि कुठलं काय? अमिताभ होताच कुठे? देअर वॉज ओन्ली दिलीपकुमार अँड दिलीपकुमार.’

वास्तविक मी शम्मीशी मुळीच सहमत नव्हतो. मला अमिताभ दिलीपकुमारच्या तोडीस तोड वाटला होता, पण शम्मीच्या अजस्र देहाकडे पाहून मी माझं मत माझ्यापाशीच ठेवलं.

गप्पांच्या ओघात (पुन्हा तेच – मोठी माणसं… गप्पा) आशा भोसले मला म्हणाली, ‘मी माझ्या ‘ये है आशा’ कार्यक्रमात तुमचे ‘फिल्लमबाजी’तले दोनचार किस्से सांगते बरं का?’

‘काही हरकत नाही’ मी म्हणालो, ‘मीदेखील माझ्या कार्यक्रमात तुमची दोन-चार गाणी म्हणतो. लोक म्हणतात की, मी जास्त चांगला गातो. लोक म्हणतात हं…’

आमच्या ‘सिटीलाइट मार्केट’मध्ये कोळणीसमोर मी विचारमग्न उभा होतो. कोलंबी घ्यायची की नाही, माझं ठरत नव्हतं. तोच मागून जयवंत दळवींचा आवाज आला, ‘घेऊ तर नकाच, पण विचारही करू नका. तुमचं तीन प्रयोगांचं मानधन त्या कोलंबीच्या एका वाटय़ात जाईल.’

‘एक्सप्रेस’च्या कँटीनमध्ये विद्याधर गोखले आणि मी आमने-सामन आलो. माझा हात हातात घेऊन गोखलेअण्णा म्हणाले, ‘सॉरी, मी तुमच्या लग्नाला येऊ शकलो नाही. पुढल्या वेळी नक्की येईन.’

सुनील गावसकर माझ्याकडे जेवायला आला होता. माझ्या छोटय़ा मुलानं तो दारात असतानाच आपली प्लास्टिक बॅट उचलून त्याला विचारले, ‘हात मोडू का तुझा?’

‘नको-नको’ घाबरल्यासारखं दाखवीत सुनील म्हणाला, ‘अजून थोडे दिवस खेळायचं म्हणतोय.’

परवा काही कामासाठी मी माहीम पोलीस स्टेशनला गेलो होतो. अधिकाऱयांच्या गराडय़ात मी म्हणालो, ‘तो बँकेवर दरोडा टाकणारा मीच तुम्हाला कळलेलं दिसतंय.’

सगळे ‘खो खो’ हसले. मला तो घोर अपमान वाटला. म्हणजे मी इतका मेंगळट दिसतो?…

[email protected]