
>> सुदीप डांगे
महाराष्ट्र समाजसेवकांची खाण आहे. यातील एक हिरा म्हणजे डॉ. बाबा आमटे. बाबांनी कुष्ठरुग्ण सेवेचे रोप वरोरा येथील ‘आनंदवन’ येथे लावले. बाबांच्या हयातीतच त्यांची मुले-सुना डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी, डॉ. विकास व डॉ. भारतीताई यांनी याचे वटवृक्षात रुपांतर केले. आता या आमटे कुटुंबाची तिसरी पिढी समाजसेवेचा शिवधनुष्य पेलत आहे. यातील डॉ. शीतल आमटे या तिसऱया पिढीच्या सर्वात परिचित, क्रियाशील, उत्साही, आनंदी चेहरा होता. त्यांच्या अचानक ‘एक्झिट’ने समाजसेवेचा हा वारसा खंडित झाला आहे. त्यांची आत्महत्या ही केवळ धक्कादायक घटना नाही, तर सामाजिक कार्यात येऊ घातलेल्या नव्या पिढीसाठी मोठा आघात मानला जात आहे.
वयाच्या अवघ्या चाळीशीच्या आत शीतल आमटे यांनी आपली स्वतंत्र ओळख आमटे परिवारात आणि महाराष्ट्रात निर्माण केली. वारसाने मिळालेल्या सामाजिक जाणिवांना आधुनिकतेची आणि कल्पकतेची जोड दिली. अखंड प्रयोगशीलता, नव्याचा ध्यास घेतलेल्या शीतल यांचे ‘आनंदवन’चे स्मार्ट व्हिलेजमध्ये रुपांतर करण्याचे स्वप्न जवळपास पूर्ण केले होते. 2003 मध्ये नागपुरच्या मेडिकल कॉलेजमधून एम. बी. बी. एस. झाल्यानंतर त्यांनी सोशल आंत्रप्रनरशिप हा अभ्यासक्रम पूर्ण केला. अमेरिकेत जाऊन हार्वर्ड विद्यापीठातून लीडरशिपचा कोर्सही पूर्ण केला. डॉक्टर म्हणून कुष्ठरुग्णांची सेवा करताना त्यांचे नेतृत्वही उजळून निघाले. ‘आनंदवन’च्या महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून काम करीत असतानाच वयाच्या चाळीशीच्या आत केलेल्या कामाबद्दल 2016 मध्ये ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने ‘यंग ग्लोबल लीडर’ म्हणून त्यांची निवड केली.
स्मार्ट आणि सक्षम व्हिलेज
शीतल आमटे या नव्या पिढीच्या प्रतिनिधी होत्या. त्यांच्या नवनव्या कल्पनांमधून स्मार्ट आणि सक्षम व्हिलेज साकारले. त्यांचे पती गौतम करजगी यांनी त्यांना मोलाची साथ दिली. गौतम यांचा सक्रिय सहभाग राहीला. अपंगांसाठी ‘निजबल’, बेरोजगार युवकांसाठी ‘युवाग्राम’, ‘आनंद मुकबधिर विद्यालय’, ‘आनंद अंध विद्यालय’ या शाळांचे डिजिटलायझेशन शीतल यांनी केले. सौर ऊर्जा प्रकल्प असो की टेक महिंद्रा फाऊंडेशनची मदत यात शीतल यांचाच पुढाकार होता. पर्यावरणाबाबत त्यांची आगळी-वेगळी कल्पना होती. त्यांनी ‘मियावाकी’ पद्धतीने चार जंगल वसविली. जंगल उभारणे म्हणजे केवळ वृक्ष लागवड करणे नाही, तर पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करणे हा त्यामागचा उद्देश होता. वैद्यकीय उपचाराबरोबरच शिक्षण, मुकबधिर, अंध विद्यार्थ्यांना शिक्षण, स्वयंपूर्ण गाव, पर्यावरण, रोजगार याविषयी त्या सातत्याने काम करीत राहिल्या. ‘आनंदवन’मधील बनणाऱया वस्तूंचे स्टॉल्स काळाघोडा महोत्सवात लावला जातो तेव्हा मुंबईकर त्याची अतुरतेने वाट बघतात.
संघर्ष कशामुळे?
डॉ. विकास आणि भारती आमटे यांची डॉ. शीतल व डॉ. कौस्तुभ ही दोन मुलं, तर डॉ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांची डॉ. दिगंत, डॉ. अनिकेत आणि डॉ. आरती ही तीन मुलं. शीतल यांच्या आत्महत्येमुळे या तिसऱ्या पिढीतील समाजसेवेचा वारसा आज खंडीत झाला. काही महिन्यांपूर्वी प्रसारमाध्यमात कौटुंबिक वाद महाराष्ट्रापुढे आला. काहींनी या वादाला फोडणी घातली. सोशल मिडियावरही चर्चेला गेला. या नैराश्यातून डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केली. डॉ. बाबा आमटेंची लाडकी नात गेली, डॉ. विकास यांची लेक गेली…, महाराष्ट्राची प्रयोगशील, कल्पक समाजसेविका गेली. आनंदवनातील ‘आनंदी’ लेक गेली…































































