प्रासंगिक – समृद्ध मराठीसाठी…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकण मराठी परिषद गोव्याचे अठरावे शेकोटी साहित्य संमेलन दिनांक 17 व 18 डिसेंबर रोजी म्हापसा येथील श्री बोडगेश्वर संस्थान परिसरात संपन्न होत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक देवीदास फुलारी यांच्या अध्यक्षीय भाषणाचा संक्षिप्त भाग.

गोव्यामध्ये जवळपास 450 वर्षे पोर्तुगीज राजवट होती. त्यानंतर इथे विविध जाती, धर्मांचे मराठी भाषिक लोक राहिलेले आहेत आणि त्यांनी मराठी भाषा व मराठी संस्कृती टिकवून ठेवली. गोव्यातील वाङ्मयीन व सांस्कृतिक चळवळीने आपले एक स्थान निर्माण केले आहे. भाषा, व्यवहार, इतिहास, साहित्य, संस्कृती अशा सर्वच प्रांतात गोव्याची परंपरा मराठीत राहिली आहे. ही परंपरा पुढे नेण्याचे काम कोकण मराठी साहित्य परिषद करीत आहे.

आजच्या जागतिकीकरणाच्या झंझावातात मराठी भाषा टिकणार आहे की नाही? असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. समृद्ध परंपरा असलेली मराठी भाषा आज साधक-बाधक चर्चेत अडकलेली आहे. मराठी भाषा अक्षय आहे, अभंग आहे. तिला उज्ज्वल भवितव्य आहे असे सांगणारा एक मोठा संप्रदाय आहे, तर दुसऱ्या गटाचे असे मत आहे की, पु. भा. भावे, व. पु. काळे, पु. ल. देशपांडे, श्री. पु. भागवतांच्या वाङ्मयानंतर मराठी वाङ्मयाचा व्यवहार झालेला नाही. निखळ मराठी भाषेचा जरी विचार केला, तर मराठी भाषेवर इतर भाषेचे आक्रमण होऊ लागले आहे, अशी एक विचारधारा आहे. यात थोडेसे तथ्यपण आहे. असे असले तरी मराठी भाषेत काही परभाषेतील शब्द लीलया वापरले जातात. यातून मराठी भाषेच्या प्रगतीवर काही परिणाम होईल असे व्यक्तीशाः मला वाटत नाही. परभाषेतील शब्दाला मराठी पर्यायी शब्द सोपा असेल, तर तो रूढ व्हावा आणि अवघड असेल तर तो वापरण्याचा आग्रह धरू नये, असे मला वाटते.

यासंदर्भात जपानी माणसांचा आदर्श घेण्यासारखा आहे. तेथे नव्या शब्दाचं लगेच जपानीकरण होतं. लगेचच वृत्तपत्रे तो वापरतात मग तो शब्द रूढ होतो. अपरिचित शब्दाला पर्यायी तीन-चार शब्द प्रसारित होतात, त्यातला जो शब्द वाचक उचलून धरेल तो टिकतो. आपल्याकडे असा प्रयोग व्हायला पाहिजे, जेणेकरून मराठी वैभव प्राप्त होईल.

आजच्या प्रगत युगात नवनवे आविष्कार जन्मास येत आहेत, त्याचे शब्द इंग्रजी भाषेतूनच अवतरत आहेत. ब्रेकिंग न्यूज, ब्रॉडबँड, इंटरनेट, फेसबुक, फॅक्स, ई-मेल असे कितीतरी शब्द झपाटय़ाने उपयोगात येत आहेत. याचे मराठीकरण करण्यात अयशस्वी होत आहोत.

मराठी शब्दच वाणीत सहज येतात, अशा वेळी इंग्रजीऐवजी मराठी शब्दांचा सहेतुक वापर व्हायला हवा, मात्र काही मराठी शब्द एवढे अवघड वाटतात की, इंग्रजी शब्द सोपे व वापरण्यास योग्य वाटतात. अशा वेळी इंग्रजी शब्दांचा वापर करून या शब्दाला मराठीत सामावून घेणे योग्य राहील. याच न्यायाने हिंदी, उर्दू किंवा अन्य भाषेतील शब्दांचाही विचार करता येईल. याच पद्धतीने परभाषेतील काही शब्द मराठीमध्ये अपरिहार्यपणे येत असतील, तर असे काही पर्यायी शब्द निर्माण करावे लागतील. मराठी भाषा अधिक समृद्ध कशी होईल? यासाठी सर्वदूर प्रयत्न होणे आवश्यक आहे.

मराठी वाङ्मयाची परंपरा खरे म्हणजे लक्षणीय राहिली आहे. चक्रधर, ज्ञानेश्वर, नामदेव, चोखामेळा, सावता माळी, तुकाराम, सेना न्हावी यांच्यापासून ते बहिणाबाई, केशवसुत, खांडेकर, कुसुमाग्रज, विदा करंदीकर यांचा कार्यकाल पाहता हे लक्षात येईल. परिवर्तन हा सृष्टीचा अलिखित नियम असतो. सगळय़ाच प्रांतात बदल घडवून आणणारी ही व्यवस्था वाङ्मयाच्या प्रांतातही बदल घडकीत असते. या अटळ प्रक्रियेतूनच ग्रामीण दलित, स्त्रीवादी, आदिवासी आणि वंचितांचे अनुभूतीचे क्षितीज उत्तरोत्तर लेखनातून उजळू लागले आहे. नागरी जीवनाबरोबर गावगाड्यातील शेत, शिवारातील वाडी, तांड्यातील हुंदके कागदावर उतरू लागले आहेत. एका प्रदीर्घ कालखंडानंतर शोषितांनी आपले मौन सोडले आहे. या सर्व इतिहासाचे पडसाद सर्वच संमेलनातून उमटत असतात.

अनेक वर्षांची परंपरा असलेली मराठी संमेलने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचे अविभाज्य असे अंग आहेत. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने साहित्य व्यवहाराकवर प्रकाशझोत पडत असतो. हा प्रकाशझोत पुढील सकस साहित्य निर्मितीसाठी संप्रेरकाचे काम करीत असतो. कोकण मराठी साहित्य परिषदेने आयोजित केलेले हे अठरावे शेकोटी साहित्य संमेलन एक मैलाचा दगड ठरणार आहे. कारण यातूनच अनेक साहित्यिक निर्माण होणार आहेत, साहित्य संस्कृती आणि शिक्षणाचा सुरेख संगम येथे घडणार आहे. संमेलनात एकत्र आलेली सारस्कतांची ही मंदियाळीच मराठी वैभव प्राप्त करून देईल, याविषयी माझ्या मनात शंका नाही.