
राज्याच्या राजकारणात सध्या मुख्यमंत्री पदावरून चर्चांना उधाण आलं आहे. यासंदर्भातील प्रश्न विचारल्यानंतर शिंदे गटातील कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपमधील नेत्याचं नाव घेतल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. अब्दुल सत्तार यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांविषयी वक्तव्य केलं आहे. विखेंनी मुख्यमंत्री व्हावं का, असा प्रश्न सत्तारांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, ‘हनुमानासारखा जसा भक्त असतो, तसं माझी छाती फाडून बघितली तर त्यात विखे पाटील दिसतील’, असं उत्तर त्यांनी दिलं. मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे असताना आणि खुद्द शिंदे गटातून मंत्री झालेले असताना देखील त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव घेतल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे शिंदे गटात सारंकाही सुरळीत नाही, अशीच चर्चा सुरू असून मुख्यमंत्री पदासाठी भाजपमध्ये शर्यत असल्याचं दिसत आहे.
विखेंनी मुख्यमंत्री व्हावं का, असं सत्तारांना विचारण्यात आलं. यावर उत्तर देताना ते म्हणाले की, ‘हनुमानासारखा जसा भक्त असतो, तसं माझी छाती फाडून बघितली तर त्यात विखे पाटील दिसतील. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असून, त्यांनी विखे पाटील यांना महत्वाची जबाबदारी दिली आहे. पण कुणाला वाटणार नाही की, आपला मित्र काहीतरी व्हावा. मी तर म्हणतो त्याच्यापुढे त्यांनी जावं. पण विखे पाटील यांची अडचण होईल असे प्रश्न विचारु नका’, असं म्हणत सत्तार यांनी स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न केला.
मात्र सत्तार यांच्या या विधानामुळे शिंदे गटात देखील भाजपचाच मुख्यमंत्री असल्याचं आता बाहेर येऊ लागलं आहे. गेल्या काही दिवसातले राजकीय घटना बघता मुख्यमंत्री बदलाच्या हालचालींनी वेग घेतल्याच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत.
सध्या भावी मुख्यमंत्री म्हणत झळकलेली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची पोस्टर्स चर्चेत आहेत. त्यानंतर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांचेही पोस्टर्स झळकले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी जयंत पाटील हे आदर्श मुख्यमंत्री ठरतील असं विधान केलं. आता अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यातून राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव समोर आलं आहे. त्यामुळे पडद्यामागे बऱ्याच घडामोडी सुरू असल्याचंही बोललं जात आहे.



























































