
एकनाथ शिंदे भाजपमध्येच असल्याचं मोठं विधान करून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी ऐन दिवाळीत धमाका केला आहे. सोमवारी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना त्यांनी हा दावा केला असून मिंधे गटावर हल्लाबोल केला आहे.
एकनाथ शिंदेंचा गट लोकसभा निवडणुकांनंतर भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा असल्याचं पत्रकारानं विचारतच संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक शैलित उत्तर दिलं आहे. शिंदे हे आताच भाजपमध्ये आहेत. तेव्हा कशाला जायला पाहिजे. त्यांच्या अंतवस्रांवर ‘कमळ’च असल्याचंही राऊत म्हणाले. त्यांना मुख्यमंत्री पद देखील त्यामुळेच मिळालं असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. आताच ते भाजपचे गुलाम झाले असून गुलामांना स्वत:चं मत आणि स्वाभिमान नसतो, असंही ते म्हणाले.
दिवाळी असल्यानं संयम राखला, उपकार माना!
मराठी माणसाची बेअब्रू केली त्यांनी शिवसेनेला ज्ञान देण्याचं काम करू नये, असा सणसणीत टोला लगावत राऊत म्हणाले की, ‘मुंब्र्याला आम्ही गेलो, हजारों शिवसैनिक रस्त्यावर उतरले. पोलिसांनी आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला. नक्कीच संघर्ष टाळला. तुमच्याकडे जर सत्ता नसती आणि पोलीस नसते तर चित्र वेगळं दिसलं असतं. दिवाळी आहे आम्ही संयम राखला. त्याचे उपकार मानले पाहिजेत त्यांनी’.
भाजपला विरोधकांचं भय
तेजस्वी यादव यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना भाजपच्या मनात विरोधीपक्षांचं भय असल्याचं राऊत म्हणाले. आपल्या विरोधकांना काम करू द्यायचं नाही, असा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. मराहाष्ट्र, राजस्थान, प. बंगाल, छत्तीसगड जिथे भाजपची सत्ता नाही आणि जिथे 2024 मध्ये भाजप पराभूत होणार आहे तिथे भाजप हेच करत आहे. पण लालू यादव आणि त्यांचं कुटुंब मजबूत आहे, ते तुटणार नाहीत. आमच्या एकनाथ शिंदेंप्रमाणे ते गुडघे टेकणार नाहीत. ते लढत राहतील. लालू यादव-तेजस्वी यादव यांची लढाई सुरू असतील तेव्हा आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहोत, असं राऊत यांनी ठामपणे सांगितलं.





























































