मिंधे गटाकडून शिवसेना संसदीय गटनेतेपदी बेकायदा नवी नियुक्ती

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून बेकायदेशीरपणे मिंधे गटाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळवले. यासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाच शिवसेनेच्या संसदीय गटनेतेपदी खासदार संजय राऊत यांच्याऐवजी गजानन कीर्तिकर यांची बेकायदा नवी नियुक्ती करण्यात आली आहे. मिंधे गटाकडून तसे पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना देण्यात आले आहे.

‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह मिंधे गटाला देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून आव्हान देण्यात आले आहे. याशिवाय शिवसेनेशी गद्दारी करून महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे सत्तेत आलेल्या ‘ईडी’ सरकारच्या वैधतेलाच सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या घटनापीठापुढे याबाबतची सुनावणी पूर्ण झाली असून निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे. अशातच कोणताही अधिकार नसताना मिंधे गटाने बेकायदेशीरपणे शिवसेना संसदीय गटनेतेपदात बदल केला आहे.

अशी अनेक पदे ओवाळून टाकू – संजय राऊत

‘आम्ही जर खोके घेत, गुडघे टेकले असते तर त्या पदावर राहिलो असतो. आम्हालाही सांगण्यात आलं, कशाला राहताय? काय राहिलंय तिकडे, आमच्याकडे या. त्यावर मी म्हटलं थुंकतो तुमच्या ऑफरवर. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेशी बेईमानी करणार नाही. अशी अनेक पदे ओवाळून टाकू. आम्ही स्वाभिमानी आणि निष्ठावंत आहोत, असे शिवसेना नेते-खासदार संजय राऊत म्हणाले. माझ्या पक्षाने मला भरपूर दिलं आहे. जर काही जात असेल, तर निष्ठा राखण्यासाठी आम्ही पद गमवायला तयार आहोत. लाचारी पत्करणार नाही. बाळासाहेब ठाकरेंनी केलेले संस्कार निष्ठsचे आणि इमानदारीचे आहेत. पदासाठी, सत्तेसाठी गुडघे टेकण्याचे नाहीत. पद आज गेले, उद्या परत येईल. तेवढी धमक आमच्या पक्षात आणि नेतृत्वात आहे,’ असा ठाम विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.