वीज वितरण अधिकाऱ्याचा मनमानी कारभाराचा निषेध, संतप्त महिला आणि शेतकऱ्यांचा मुख्य अभियंत्यांना घेराव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वीज वितरणच्या कर्मचारी आणि अधिकाऱयांच्या मनमानी कारभाराला कंटाळलेल्या नागरिकांनी आज शिराळा येथील वीजवितरण कार्यालयाला टाळे ठोकले. यावेळी वीजवितरण आणि अधिकाऱयांनी केलेल्या अरेरावीमुळे महिला आणि शेतकऱयांनी मुख्य अभियंता पी. एम. बुचडे यांना घेराव घातला.

शिराळा येथील प्राध्यापक कॉलनीची लाईन सध्या कापरीच्या डीपीवरून जोडलेली आहे. ती लाईन शिराळा शहरातील डीपीवरून जोडण्याच्या मागणीसाठी मोठय़ा संख्येने महिला जमा झाल्या होत्या. तर वाकुर्डे खुर्द, अंतरी खुर्द या गावांमध्ये वारंवार वीज खंडित होत आहे. याबाबत या गावातील शेतकरी व ग्रामस्थही मोठय़ा संख्येने उपस्थित होते. एकाचवेळी शिराळा येथील महिला व उत्तर भागातील शेतकरी आणि ग्रामस्थ वीज वितरणाच्या कार्यालयात जमा झाल्याने वीजवितरणचे कर्मचारी व अधिकाऱयांची भंबेरी उडाली होती.

शिराळा उत्तर भागातील वाकुर्डे खुर्द व वाकुर्डे बुद्रूक, अंतरी खुर्द गावांमध्ये गेल्या चार दिवसांपासून घरगुती व शेतीचा वीजपुरवठा बंद असून, याबाबत शिराळा व शिरसी सबस्टेशनला विचारणा केली असता, संतापजनक व उडवाउडवीची उत्तरे देऊन शेतकरी व ग्रामस्थ यांना वेठीस धरले जात आहे. विजेमुळे शेतकऱयांच्या हातातोंडाशी आलेले पीक पाण्याअभावी वाया गेल्यास वीज वितरण जबाबदार राहील, असे निवेदन मुख्य अभियंता बुचडे यांना देण्यात आले.

शिराळा शहरातील प्राध्यापक कॉलनी येथील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. तसेच, लोडशेडिंग चालू असतानाही दिवसा व रात्री लाईट वीज जात आहे. त्यामुळे येथील महिलांनी मुख्य अभियंत्यांना घेराव घालून निवेदन दिले. यावेळी नगरसेविका सीमा कदम, सरोजिनी कदम, रुपाली कदम, संगीता पाटील, सविता माळी, राजश्री पाटील, रोहिनी कवठेकर, सुनीता घागरे, शोभा पाटील, दीपा घोलपे, सुनीता नाईक, वैजयंती गिरी आदी महिलांसह शिराळा उत्तर भागातील शिवाजी पाटील, दिनकर पाटील, सचिन केसरकर, सचिन पाटील, अश्विन पाटील, शंकर मुळीक जालिंदर पाटील, सुनील इंगळे, ओंकार पाटील, संदेश पाटील, विनायक पवारांसह शेतकरी उपस्थित होते.