
गाळ्यासमोरील जागेच्या वादातून दोनजणांनी युवकावर गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री शिर्डीत घडली आहे. या घटनेत जखमी झालेल्या तरुणावर साईबाबा रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी गोळीबार करणाऱया दोघांसह पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
सूरज प्रकाश ठाकूर असे जखमीचे नाव आहे. किरण हजारे, तन्वीर रंगरेज, अक्षय लोखंडे, दीपक गोंदकर, रवी गोंदकर यांनी गोळीबार केल्याची फिर्याद सूरजचा भाऊ सचिन ठाकुर याने पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पोलिसांनी यातील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सचिन ठाकुर व त्याचा भाऊ सूरज ठाकूर यांनी श्री हनुमान मंदिरालगत असणाऱया श्री साई कॉम्प्लेक्समध्ये युवराज निंबाळकर यांचा गाळा भाडेतत्त्वावर चालवण्यास घेतला होता. या दुकानासमोर सहा बाय चार अशी जागा होती. मात्र, या जागेत किरण हजारे, दीपक गोंदकर, रवि गोंदकर यांनी नॉव्हेल्टी व प्रसादाचे दुकान सुरू केले होते. या जागेवरून त्यांच्यात वाद होत होते.
शुक्रवारी पहाटे दीपक गोंदकर याने सूरजला फोन करून हॉटेल मथुराच्या पार्ंकगमध्ये या, बोलायचे आहे, असे सांगितल्याने सचिन व सूरज तेथे गेले. त्यांचे मित्र नीलेश जाधव व स्वप्नील भोसले हेही तेथे आले. त्यानंतर किरण हजारे, तन्वीर रंगरेज, अक्षय लोखंडे, दीपक गोंदकर कारमधून तेथे आले. किरण हजारे याने रवी गोंदकरला फोन लावून सूरज ठाकुरचे काय करायचे, असे विचारले. रवि गोंदकर याने ‘सूरज ठाकुरला फार माज आला आहे. त्याचा काटा काढ’, असे सांगताच हजारे याने सूरजवर गोळीबार केला. यात एक गोळी सूरजच्या शरीरातून आरपार गेली आहे. तर, एक गोळी चाटून गेली आहे. जखमी अवस्थेतही सूरज पळाला. मात्र, किरण हजारे याने पळत असतानाही त्याच्यावर गोळीबार केला. यात सूरज हा गंभीर जखमी झाला. सचिन ठाकुर व नीलेश जाधव यांनी त्याला श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून, त्याची प्रकृती गंभीर आहे.
घटनेची माहिती मिळताच, शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सचिन ठाकुर याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, दोनजणांना ताब्यात घेतले आहे. तर, तीन आरोपी फरार आहेत. सहायक पोलीस निरीक्षक सुरेश माने तपास करत आहेत.
वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी मोक्का कारवाईची मागणी
n या घटनेमुळे शिर्डी व परिसरात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. परिसरात परत एकदा गुन्हेगारी प्रवृत्ती डोके वर काढू लागली आहे. वाळूतस्करी, अवैध धंदे, मटका, जुगार, पाकीटमारी व यातून मिळणाऱया पैशातून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. या गुन्हेगारी प्रवृत्तीला वेळीच ठेचणे गरजेचे असून, त्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या मुसक्या आवळाव्यात व शिर्डीतील गुन्हेगारी संपवण्यासाठी मोक्का अंतर्गत कारवाया कराव्यात, अशी मागणी साईभक्त व नागरिकांकडून केली जात आहे.





























































