
नगरपंचायत विजेच्या बाबतीत आता स्वयंपूर्ण होणार आहे. नगरपंचायतीच्या कनकुरी रोडलगत असलेल्या सुमारे चाळीस एकर जागेवर 580 दशलक्ष लीटर क्षमतेच्या पिण्याच्या पाण्याच्या साठवण तलावावर 1 हजार 494 सोलर पॅनल प्रकल्प बसवून त्यामधून 0.5 मेगावॅट वीजनिर्मिती होणार आहे. नगर जिल्ह्यातील हा पहिलाच प्रकल्प ठरणार आहे. या सोलर प्रकल्पामुळे दरमहा पावणेचार लाख रुपयांची वीज बचत होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी दिली.
शिर्डी नगरपंचायतीने तीन वेळा शहर स्वच्छतेचा पुरस्कार पटकावला आहे. खासदार डॉ. सुजय विखे-पाटील व आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन विकासकामांसाठी मिळत आहे. शिर्डी शहराची ओळख आता देशातील स्वच्छ शहरांमध्ये झाल्याने नगरपंचायतीने नवनवीन प्रयोग हाती घेतले आहेत.
केंद्र आणि राज्य सरकारच्या ‘अमृत पाणीपुरवठा’ योजनेंतर्गत शिर्डी नगरपंचायतच्या साठवण तलावावर सुमारे 1 हजार 494 सोलर पॅनल बसवून त्यातून 0.5 मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात येत आहे. नगरपंचायतीला महिन्याकाठी पावणेचार लाख रुपये, तर वर्षाकाठी जवळपास अर्धा कोटी रुपयांची बचत या माध्यातून होणार आहे.
या प्रकल्पासाठी अतिरिक्त जागेचा वापर केला नसून, तलावाच्या किनाऱयावरील जागेत सर्व पॅनल बसविण्यात आले आहेत. यातून 0.5 मेगावॅट वीजनिर्मिती होणार आहे. नगरपंचायतीचा वीजवापर 0.3 मेगावॅट आहे. यातून शिल्लक राहिलेली 0.2 मेगावॅट वीज महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला विकणार असून, त्यातून नगरपंचायतीच्या वीजबिलात कपात होण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचे गोंदकर यांनी सांगितले.
शिर्डी नगरपंचायतीस महावितरणला वीजबिलाच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणावर वीजबिल भरावे लागते. त्यामुळे भविष्यात शहरातील पथदिवे तसेच कार्यालयासाठी वापरण्यात येणाऱ्या वीजबिलाची अशाच प्रकारे शंभर टक्के बचत करण्यासाठी या साठवण तलावातील पाण्यावर तरंगणारे सोलर पॅनल बसवण्याचे विचाराधीन आहे. त्या पार्श्वभूमीवर याबाबतचा प्रस्ताव सादर करून सदरचा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी नगरपंचायतीकडून प्रयत्न
सुरू आहेत.
– काकासाहेब डोईफोडे, मुख्याधिकारी, शिर्डी नगरपंचायत.
































































