
अशोक सदाफळ, शिर्डी
शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी भक्तमंडळी कोट्यवधींचं दान देत असतात. या दानाचा भक्तांसाठी शिर्डीतील साई बाबा रुग्णालयात सोई-सुविधा निर्माण करण्यासाठी उपयोग होत नसल्याने आज शिर्डी संस्थानाचे अध्यक्ष सुरेश हावरे आणि विश्वस्त मंडळाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेत तिरडीला खांदा देण्यासाठी तृतीयपंथीयांना बोलावण्यात आलं होतं, यामुळे या आंदोलनाबाबत उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.

शिर्डी साई संस्थानाने नुकताच यवतमाळ, नागपूर आणि चंद्रपूर इथल्या वैद्यकीय महाविद्यालयांना एकूण मिळून ७१ कोटींचा निधी मंजूर केला आहे. शिर्डी संस्थानात येणाऱ्या पैशांचा गरीबांच्या भल्यासाठी वापर होणं अपेक्षित आहे. मात्र असं न होता त्याची खिरापत विदर्भातील वैद्यकीय महाविद्यालयांना निधी म्हणून वाटली जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. शिर्डीतील साई बाबा रुग्णालयात रुग्णांसाठी पुरेशा सुविधा नाहीयेत. वैद्यकीय महाविद्यालयांसाठी दिलेला मदतनिधी जर इथल्या रुग्णालयात नवी उपकरणे, अँम्ब्युलन्स आणि रुग्णांसाठी इतर सोई-सुविधा देण्यासाठी वापर करण्यात आला असता तर त्यातं आम्ही स्वागत केलं असतं असं आंदोलन करणाऱ्या शिर्डीकरांनी म्हटलं आहे.

























































