साई दरबारी दर्शनाची तयारी ,राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनंतर मंदिर खुले करणार

1388

देशातील श्रीमंत धार्मिक स्थळांपैकी एक असलेले शिर्डीचे साई मंदिर दर्शनासाठी खुले करण्याची जोरदार तयारी सुरू आहे. राज्य सरकारने परवानगी देताच मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करीत हे मंदिर उघडले जाणार आहे. यासंदर्भात शिर्डी संस्थान सध्या तिरुमाला तिरूपती ट्रस्टचा सल्ला घेत आहे.

कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या हेतूने भक्तांसाठी दर्शन रांगेची व्यवस्था असणार आहे. देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर साई मंदिर 17 मार्चपासून बंद ठेकले आहे. त्यामुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करीत साई मंदिर पुन्हा खुले करण्याची तयारी शिर्डी संस्थानने सुरू केली आहे.

तिरुपती देवस्थान कोरोना महामारीच्या काळातही पुरेशी खबरदारी बाळगून भक्तांच्या सेवेत आहे. याठिकाणी 11 जूनपासून जवळपास 6 लाख लोकांनी दर्शन घेतले. दर्शनाच्या चोख, सुरक्षित व्यवस्थेमुळे संबंधित भक्तांमध्ये कोरोना संसर्ग झाला नाही. याच दर्शन व्यवस्थेचे अनुकरण करीत साईबाबांचा दरबार भक्तांसाठी खुला केला जाणार आहे. याबाबत तिरुपती देवस्थाननेही शिर्डी संस्थानला पुरेपूर मार्गदर्शनाची तयारी दाखवली आहे.

दररोज कोटय़वधीच्या दानाचे नुकसान
साई मंदिरातील दानपेटीत दरवर्षी जवळपास 600 कोटी रुपये जमा होतात. सध्या मंदिर बंद असल्याने दररोज दीड कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. लॉकडाऊन काळात मंदिराला ऑनलाइन अडीच कोटींहून अधिक रुपयांचे दान प्राप्त झाले. कोरोनाच्या आधी दररोज जवळपास 60 हजार भक्त साईबाबांचे दर्शन घेत होते. गुरूपौर्णिमा व इतर सणांमध्ये ही संख्या 1 लाखाच्या पुढे जात होती. तिरुपती देवस्थानप्रमाणेच साईबाबा मंदिर हजारो लोकांच्या रोजगाराचे साधन आहे. मंदिर ट्रस्टमध्ये जवळपास 8 हजार कर्मचारी आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या