शिरीषायन – मोठय़ांच्या छोटय़ा गोष्टी : 23

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शिरीष कणेकर

रामचंद्र नरहर चितळकर ऊर्फ सी. रामचंद्र हा संगीतसूर्य माझ्याजवळच शिवाजी पार्कला राहायचा. माझ्या ‘गाये चला  जा’ या दुसऱ्या पुस्तकाला प्रस्तावना घ्यायला मी त्यांच्याकडे गेलो. त्यांनी पुस्तक ठेवून घेतले व आठपंधरा दिवसांनी परत यायला सांगितले. मी भलताच उत्तेजित होऊन त्यांच्याकडे पुन्हा गेलो. मधले दहा दिवस मी कसे काढले मला माहीत.

‘या S S ।’ त्यांच्या थाटात त्यांनी मोठय़ा आवाजात माझं स्वागत केलं. ‘तुम्हाला आनंदाची बातमी देतो. मी प्रस्तावना न लिहिण्याचं ठरवलंय.’

‘या’नं ताठ झालेली माझी कॉलर क्षणार्धात घामानं भिजली. मी सुकलेल्या ओठांवरून जीभ फिरवीत तसाच उभा राहिलो.

‘अहो, तुम्ही काय वाटेल ते लिहिलंय,’ रामचंद्र गरजले. ‘एकीकडे तुम्ही म्हणता की लताच्या आगमनापूर्वी सी. रामचंद्र लोकप्रिय होते.’

‘होतेच.’ मी कसाबसा म्हणालो.

‘आणि दुसरीकडे तुम्ही लिहिता की, लतापासून फुटून निघाल्यावर सी. रामचंद्र निप्रभ होत गेले. याला काही अर्थ आहे का? तुमच्या दोन विधानांतील विरोधाभास तुम्हाला कळत नाही का?’

मी माझं पुस्तक उचललं व बाहेर पडलो. मी त्यांना सांगू इच्छित होतो, पण तोंड उचकटून बोलू शकलो नाही की, गॅसचा शोध लागण्यापूर्वी स्त्रिया चुलीवर स्वयंपाक करीत होत्या, पण एकदा गॅसची सवय झाल्यावर एखाद् दिवशी गॅस नसला की त्या हॉटेलातून अन्न मागवायला लागल्या. अगदी तसंच थेट लता मंगेशकरच्या बाबतीत तुमचं झालं. इतक्या वर्षांत लताशिवाय गाणी करण्याची तुमची सवय सुटली होती…

रामचंद्र अनिल विश्वासला गुरुस्थानी मानत. एकदा ते गुरूकडे गेले व म्हणाले, ‘माझं एक गाणं मला तुम्हाला ऐकवायचंय. तुम्ही मला माराल, पण तरी ऐकाच.’

अनिलदानं गाणं ऐकलं व तो म्हणाला, ‘यू आर राइट. मी खरंच तुला मारीन. पण एक सांगतो, पण तुझं हे गाणं प्रचंड गाजेल.’

ते गाणं ‘शहेनाई’ (1946) चित्रपटातलं होतं व मीना कपूर, शमशाद बेगम आणि महंमद रफी यांनी गायलं होतं – ‘आना मेरी जान, मेरी जान संडे के संडे.’

हिंदी चित्रपटांतील सर्वोत्कृष्ट ‘लोरी’ अण्णा रामचंद्रांच्या नावावर आहे – ‘धीरे से आजा रे अखियन में…’ (अलबेला – साल 1951).

हिंदी चित्रपटांतील सर्वात आर्त विरहगीतही त्यांच्याच नावावर आहे – ‘तुम क्या जानो तुम्हारी याद में हम कितना रोये’ (शिनशिनाकी बुबलाबू – साल 1952).

‘दिले बेकरार सो जा’ (‘घुंगरू’), ‘गम की वादी में खुशी का कारवां’ (‘साकी’), ‘कटते है दुख मे ये दिन’ (‘परछाई’), ‘जब दिल को सतावे गम’ (‘सरगम’), ‘नाउमीद होके भी’ (‘संगीता’), ‘दर्द जगा के ठेस लगा के’ (‘सिपहिया’), ‘महेफिल मे जल उठी शमा’ (‘निराला’), ‘दिल से भूला दो तुम हमे’ (‘पतंगा’), ‘वो पास आ रहे है’ (‘समाधी’), ‘बलमा बडा नादान रे’ (‘अलबेला’), ‘दिल की कहानी’ (‘सगाई’), ‘ऐ दर्दे मुहोब्बत’ (‘हंगामा’), ‘ये जिंदगी उसी की है’ (‘अनारकली’), ‘ये हवा ये समाँ’ (‘शगुफा’), ‘राधा ना बोले’ (‘आझाद’), ‘ऐ प्यार तेरी दुनिया से’ (‘झांझर’) ही लताची गाणी इतकी गोड आहेत की मधुमेह्यानं ती ऐकू नयेत.

आधी चाल बनवायची; मग कवीला त्यात शब्द कोंबायला सांगायचे, हा प्रकार रामचंद्रांना अजिबात मान्य नव्हता. ते म्हणत, ‘हे म्हणजे आधी झबलं शिवायचं व मग त्यात पोरगं फिट करायचं असा उफराटा प्रकार झाला.’

‘आझाद’चं अवघं संगीत सी. रामचंद्रांनी अवघ्या आठ दिवसांत केले. राजेंद्र कृष्ण गाणी लिहीत गेला व अण्णा चाली लावत गेले. काम खतम, पैसा हजम. या वेगानं काम करण्यामुळे निर्मात्यांनी ‘आझाद’

नौशादला न देता अण्णांना दिला. त्यांनी नौशादपेक्षा एक रुपया मानधन जादा आकारलं.

‘भोली सूरत’ची ओबडधोबड चाल त्यांनी रस्त्यावरून जाताना एका भंग्याच्या लग्नात ऐकली. एक भंगी पार्श्वभूमीवर एक वाद्य बडवीत होता. त्याचा परिणाम झिंग आणणारा होता. अण्णांनी दुसऱ्या दिवशी ती चाल घासून-पुसून तयार केली, पण प्रशिक्षित, पॉलिश्ड् वादकांकडून त्यांना हवा तसा ‘पंच’ मिळत नव्हता. शेवटी अण्णा गाडी घेऊन बाहेर पडले व त्या भंग्याला शोधून घेऊन आले. रेकॉर्डिंग कशाशी खातात हे माहीत नसलेला भंगी जोरजोरात बडवू लागला. रेकॉर्डिंग करणे अशक्य झाले. शेवटी त्याला स्टुडिओच्या बाहेर उभं करून सी. रामचंद्रांनी हवा तो परिणाम साधला. असे झाले ‘भोली सूरत दिल के खोटे, नाम बडे और दर्शन छोटे’ हे सदाबहार गाणं तयार.

अनिल विश्वास त्यांना प्रेमानं व कौतुकानं ‘खरा मर्द मराठा’ म्हणायचा. त्यांनी 1942 ते 1971 या काळात 109 हिंदी चित्रपटांना संगीत दिलं.

सी. रामचंद्रांकडे मनोरंजक किश्श्यांची लयलूट होती. मद्रास रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर ओमप्रकाशने हिजडय़ांकरवी राजेंद्र कृष्णला हार घालून सत्कार (?) कसा केला व अण्णा आणि दिलीपकुमार लोणावळय़ाला चंद्र बघायला कसे जायचे याचं रसभरीत वर्णन अण्णा रामचंद्रांच्या तोंडूनच ऐकण्यासारखं होतं. त्यांचंच एक गाणं आठवतं – ‘अब वो राते कहाँ, अब वो बाते कहाँ…’

[email protected]