गोरे गोरे, ओ बांके छोरे

1559

>> शिरीष कणेकर

आई शुद्ध शाकाहारी व मुलगा शुद्ध मांसाहारी हे ‘कॉम्बिनेशन’ जगावेगळं नाही वाटत? म्हणजे आता बघा हं, आईनं मुलाला अर्थातच शाकाहारी अन्न घालूनच वाढविलं असणार. मग अशी कुठली घटना होती, जिच्यामुळे मुलगा रातोरात मांसाहारी बनला? वरणभाताऐवजी चिकन बिर्याणी खावी अशी ऊर्मी त्याच्या शाकाहारी मनात एकाएकी कशी काय दाटून आली? जे कधी खाल्लंच नव्हतं त्याची ओढ त्याच्या ओढाळ मनात कशी निर्माण झाली? मित्रांनी फूस लावून त्याला हाटलीत नेऊन खिमा चारला असेल का? (असली कुकर्मे साधारण मित्रच करतात. एक से दो भले, दो से भले चार!). बरं, ही हौस भागवण्यासाठी त्याला सतत घराबाहेर मांसाहाराचा दुराचार करावा लागत असणार. आईला हे कळल्यावाचून राहत नसणार. आपला पोटचा गोळा कोल्हीकुत्री खातो या ज्ञानप्राप्तीवर तिची प्रतिक्रिया काय होती? ‘मलाही एखादी चिंबोरी फोडायला आण’ असं तर ती निश्चित म्हणत नसणार. एवढय़ा मोठय़ा मुलाला थोबडणंही तिला शक्य नसणार. ‘मी वांग्याची भाजी करत्येय, की आजही तू कोपऱयावरच्या मालवणी हॉटेलात पापलेट खायला जाणार आहेस?’ असं ती मुलाला ममत्वानं विचारत असेल का? एव्हाना मांसाहारी भोजनाचं मेनू कार्ड आईला पाठ झालं असेल का? एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत असं म्हणतात, पण एकाच घरात शाकाहारी व मांसाहारीचे दोन कट्टर प्रणेते गुण्यागोविंदानं नांदतायत. आई मुलाला अळूचं फदफदं खाण्याचा आग्रह करीत नाही व मुलगा आईच्या पानात तळलेले बोंबिल वाढत नाही. ते आपापले खाद्यधर्म निष्ठsनं पाळतात. ‘च्याऊ म्याऊ सुरमईचं कालवण खाऊ’ असं मुलगा म्हणतो, ‘च्याऊ म्याऊ फोडणीचं वरण खाऊ’ असं आई म्हणते.

रक्तरंजित अभक्ष भक्षणाला आयुष्य वाहिलेल्या त्या मुलाचं (आता या मुलाच्या मुलाचंही लग्न झालंय. कमाल आहे की नाही?) नाव आहे धनंजय गोरे. त्याच्या मुलाचं नाव आहे गंधन. (दोघांचंही आडनाव गोरे आहे. कमाल आहे की नाही?). खाण्याच्या बाबतीत मुलगा बापाचा बाप आहे (या जोडगोळीला पाहूनच बहुधा वर्डस्वर्थने लिहिलं होतं – ‘चाइल्ड इज द फादर ऑफ द मॅन’!). बाप क्वचित केव्हातरी ‘व्हेज’ तोंडाला लावत असेल. मी त्याला एकदा नैवेद्याचं गूळ-खोबरं खाताना पाहिलं होतं. एरवी चहादेखील तो चिकन-सूप असल्यागत पितो. ‘चिकन मंचुरियन’ म्हटल्याशिवाय कॉफी त्याच्या घशाखाली उतरत नाही. एकदा मी त्याला विचारलं होतं, ‘मटणाचं जेवण झाल्यावर बोकडाची अडकित्त्यात कातरलेली शिंगें तू सुपारी म्हणून चघळतोस का?’
आता धाकटी पाती गंधन (निम) गोरे यांच्याकडे वळू या (‘बडे मियाँ सो बडे मिया, छोटे मिया सुभान अल्ला’). त्याला तर प्रश्न पडतो की, शाकाहारी अन्न निर्माणच कोणी केलं? वाघ, सिंह आणि गोरे काय कडबा खातात? तो वाघाच्या किंवा सिंहाच्या पिंजऱयात गेला तर ते समोरच्या ऍल्युमिनियमच्या थाळीतील कच्चं मटण स्वखुशीनं गंधनबरोबर वाटून घेतील. सीनियर गोरेदेखील पिंजरादाखल झाले तर मात्र युद्ध पेटेल व हे युद्ध ‘मटण-युद्ध’ म्हणून इतिहासात नोंदले जाईल. कच्चं मटण कसं लागतं हे सांगणारे हे दोघंच पुरुषोत्तम असतील. दोघंही पट्टीचे पोहणारे आहेत, पण त्यांना पोहण्याच्या तलावात पोहायला आवडत नाही. ते नदीत किंवा समुद्रात पोहतात. बाहेर येताना तोंडात हमखास एखादा रावस घेऊन येतात. देवमासा तोंडात धरण्याचं त्यांचं स्वप्न आहे. त्यासाठी घरात कपाट तोंडात पकडण्याचा सराव करतात, असं त्यांचा सुतार सांगत होता. एका ताटात मटण व एका ताटात सरंगा ठेवला तर पितापुत्र कुठं जातील? ते आधी सरंग्याचा फडशा पाडतील आणि मग मटणाचे लचके तोडायला धावतील. मग रिकाम्या ताटांची खेचाताण सुरू होईल.
गंधन लग्नाला गेला (म्हणजे जावं लागलं) तर तिथल्या शुद्ध शाकाहारी जेवणाकडे ढुंकूनही न पाहता अक्षता टाकून झाल्यावर तो थेट हॉटेलचा रस्ता धरतो. तिथल्या मटणाच्या डिशेस त्याला कॉलर पकडून खेचत असतात. एकदा कशावर तरी वैतागून तो म्हणाला, ‘लहानपणी माझी आबाळ झाली म्हणून माझी वाढ खुंटली!’

वाढ खुंटली? तो बापाला आरामात कडेवर घेऊ शकेल एवढा आहे. वाढ फोफावली असती तर तो दीपक शिर्केएवढा झाला असता. अर्थात वाम वगैरेंसारखे मासे खायचे तर तसा आडमाप देह हवाच.
विख्यात साहित्यिक जयवंत दळवी यांचं मासळीवर विलक्षण प्रेम होतं. त्यांच्या सौभाग्यवती सांगतात की, उपासाच्या दिवशी हिंदू धर्माला शिव्या देत ते हॉटेलात जेवत. मच्छी बाजारात त्यांना फिरताना पाहणे हे गीरच्या जंगलात सिंहाला फिरताना पाहण्यासारखे चित्तथरारक व डोळे निववणारे दृश्य असे. त्यांच्यासमोर आम्ही कोळणीभोवती फिरणाऱया मांजरांसारखे भासत असू. एकदा कोलंबी घ्यावी न घ्यावी असा विचार करीत मी कोळणीसमोर उभा होतो तो मागून दळवींचा आवाज आला, ‘विचारदेखील करू नका. एका वाटय़ात तुमच्या चारसहा प्रयोगांचं मानधन जाईल.’
सर्वसाधारणपणे हे ‘नॉनव्हेज’वाले ‘व्हेज’वाल्यांना कमी लेखतात व हिडीसफिडीस करतात. खाण्याच्या चॉइसवरून माणसाची बुद्धी व कर्तृत्व ठरत असते की काय? जयवंत दळवी काटेरी भिंगीचा पाला आरामात खायचे म्हणून ते महान लेखक होते, असा निष्कर्ष तुम्ही काढणार की काय?
आमचे धनंजय गोरे राजमान्य मासे तर खातातच, पण आम्ही ज्यांची नावंही ऐकलेली नाहीत की ज्यांना बघितलेलंही नाही असे मासेही खात असतात. उदा. ‘मांदेली’, ‘चोर बोंबिल’, ‘मोदकं’, ‘मुडदुसे’, ‘खुबा’, ‘राणी’, ‘तारली’, ‘रेफा’, ‘रावसुले, ‘बाकस’, ‘माकुल’, ‘निवटे’, ‘कालवं’.
फक्त बोंबिल खाऊन तल्लख झालेल्या माझ्या मेंदूला एक नामी शक्कल सुचली आहे. मी धनंजय व गंधन या गोरे बापलेकांना घरी जेवायला बोलावणार आहे. ते आत आले की, बाहेरून दाराला कुलूप लावून घेणार आहे. त्यांच्यासाठी वरणभात, पोळी, चिंच-गुळाची आमटी, दाण्याचं कूट, चाकवताची भाजी, फरसबी, सुधारस असा खाशा बेत आखणार आहे.
बघूच या, ते बाल्कनीतून उडी मारून पळून जातायत का!

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या