
>> शिरीष कणेकर
सचिन तेंडुलकर माझ्या ‘फटकेबाजी’च्या एकपात्री प्रयोगाला प्रमुख पाहुणा म्हणून आला होता. आम्ही शिवाजी मंदिरच्या ‘बॅक स्टेज’ला बोलत बसलो होतो.
‘माझे पाय लटपटतायत.’ मी सचिनपाशी कबुली दिली.
‘माझेही.’ सचिन लगेच म्हणाला.
‘अरे बाबा, तुझे माझ्या क्षेत्रात लटपटतायत. माझे माझ्याच क्षेत्रात लटपटतायत. फार फरक आहे.’
सचिननं हसण्याचा प्रयत्न केला. तो फसला.
आम्ही स्टेजवर गेलो. माझे पाय जास्तच लटपटायला लागले. सचिनचे पाय स्थिर होते. विकेटवर असायचे तसे. शिवाजी मंदिरचा रंगमंच त्या दिवशी त्याच्यासाठी विकेटच होती. विकेटवर तो कशाला आणि कोणाला घाबरेल? समोरचा (गोलंदाज) त्याला घाबरायचा. त्या भूमिकेत मी होतो. मंचावरून त्याच्याशी बोलताना तो आपल्याला कुठेतरी भिरकावून देईल असेच मला सतत वाटत होते.
मुलाखत आटोपून दमदार पावलं टाकीत चहापानाला यावं तद्वत तो मंचावरून खाली उतरला. त्या क्षणी माझे पाय स्थिरावले. मी प्रयोग सुरू केला. सचिन दाद देतोय का हे मी डोळय़ांच्या कोपऱयातून बघत होतो. कोपऱयातून… कारण तो पहिल्या रांगेत कोपऱयात बसला होता. मधल्या सगळय़ा खुर्च्या त्याच्या कुटुंबीयांनी व्यापल्या होत्या. त्याचं अवघं जीवनही तसंच त्यांनी व्यापलं होतं. त्यात क्रिकेट कसं घुसलं व त्यानं त्याचा संपूर्ण ताबा कसा घेतला देव जाणे! कदाचित थोरले बंधू अजित तेंडुलकर यांना माहीत असेल.
सचिन परवा पन्नास झाला म्हणे. हय़ँ! पन्नासचं काय मोठंसं? त्याच्या बाबतीत असल्या लहानसहान गोष्टींवर जल्लोष करायचा नसतो, टाळय़ांचा गजर करायचा नसतो, पताका फडकवायच्या नसतात, त्याला डोक्यावर घ्यायचं नसतं. त्याचं नातं शंभरीशी आहे. सेंच्युरी बनी तो कुछ बात बनी. ती तशी बनलेली पाहायची आपल्या डोळय़ांना सवय आहे. शतकापूर्वी बाद होणं म्हणजे त्याच्यावर जीव लावणाऱया क्रिकेटप्रेमींशी प्रतारणा होती. अवसानघात होता. सचिन तूदेखील?… कम ऑन, वी वॉण्ट अ सेंच्युरी, ऍटलिस्ट अ सेंच्युरी…!
सचिनच्या घरात ट्रॉफीज्, बक्षिसे, मानपत्र ठेवण्यास भिंती व कपाटे कमी पडत असतील. महंमद रफीप्रमाणे या गौरवचिन्हांसाठी घरात एक स्वतंत्र भाग ठेवायला हवा. कर्तृत्व घरात मावत नसेल तर काय करणार?
सचिन तेंडुलकरला मिळालेले हे काही प्रमुख पुरस्कार पहा –
1) अर्जुन ऍवॉर्ड. साल 1994, 2) खेलरत्न ऍवॉर्ड. साल 1997, 3) पद्मश्री. साल 1999, 4) पद्मभूषण. साल 2008, 5) सर गार्फिल्ड सोबर्स ट्रॉफी (क्रिकेटर ऑफ द इयर) साल 2010, 6) भारतरत्न. साल 2013
1913 साली ‘विस्डेन’नं निवडलेल्या सर्वश्रेष्ठ जागतिक क्रिकेट संघात दुसऱया महायुद्धानंतरच्या दोनच खेळाडूंचा समावेश करण्यात आलाय – विवियन रिचर्डस् व सचिन तेंडुलकर. भारतीय वायूसेना दलानं ‘ग्रुप कॅप्टन’ हा गौरवात्मक हुद्दा सचिनला प्रदान केला.
काही मान्यवरांनी भारावून जाऊन त्याच्याविषयी काढलेले उद्गार वाचण्यासारखे आहेत.
‘मला सचिनला गोलंदाजी करायची झाली तर मी हेल्मेट घालून गोलंदाजी करीन. तो इतक्या जोरात मारतो!’ – डेनिस लिली
‘हिंदुस्थान नावाच्या देशाबरोबर आम्ही हरलो नाही, तर सचिन नावाच्या माणसाबरोबर हरलो.’ – मार्क टेलर
‘मला अनेकदा गॅरी कर्स्टनला आठवण करावी लागायची की तो कव्हरमध्ये चेंडू अडवायला उभा आहे, सचिनच्या फटक्याला टाळय़ा वाजवून दाद द्यायला नव्हे.’ – हॅन्से क्रोनिए
‘सभ्य गृहस्थहो, मी आयुष्यात पाहिलेला तो सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे आणि माझं तुम्हा सर्वांप्रमाणे नाही. मी ब्रॅडमनला पाहिलंय.’
– जॉन वुडकॉक
‘त्याला खराब चेंडू टाकू नका; चांगले चेंडूही तो सीमारेषेबाहेर मारतो.’
– मायकेल कॉस्पोरोविच
‘सचिन चालण्याच्या काठीनंही लेग-ग्लान्स मारू शकतो.’
– वकार युनूस
‘सचिनचा खेळ पाहण्यासाठी कितीतरी वेळा मी शूटिंग पुढे ढकललंय.’
– अमिताभ बच्चन
पाच फूट पाच इंच उंचीचा पिटुकला सचिन, भलेही गोलंदाजांचा कर्दनकाळ असेल, पण त्याच्या देशवासीयांच्या नजरेत तो कायम ‘तेंडल्या’ राहिलाय किंवा ‘मास्टर ब्लास्टर’ किंवा ‘सच्चू’!
आपली जीभ टाळय़ाला चिकटून बसेल अशी एक अगम्य वस्तुस्थिती सांगतो आणि थांबतो. ‘विस्डेन’ने सचिनच्या एकाही खेळीची नोंद सर्वोच्च शंभर खेळय़ांमध्ये केलेली नाही.


























































