चषक जिंकणे दुरापास्त दिसते

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शिरीष कणेकर

क्रिकेटमध्ये  भाकीत करणं यासारखी अंगलट येणारी डेंजरस दुसरी गोष्ट नसेल. आज जगातील सर्वोत्कृष्ट म्हटला गेलेला पाकिस्तानचा बाबर आझम ‘टी-20, एशियन कप’ मध्ये कसा फाफलला ते आपण बघितलंच. याउलट गेल्यात जमा असलेल्या आपल्या विराट कोहलीने बहारदार खेळ करून स्वतःच्या कारकीर्दीला पुनरुज्जीवनाचा डोस दिला. अशा गोष्टी नेहमीच घडत असल्यानं म्हणतात की, क्रिकेटमध्ये काय होईल याबद्दल आधी तोंड वाजवू नये. पटलं? मलाही पटलंय. तरीही मी विश्वचषकातील आपल्या संभाव्य कामगिरीविषयी बोलायला धजावतोय. आय अॅम हँगिंग माय नेक आऊट. पाहूया प्रत्यक्षात काय होतंय.

ऑस्ट्रेलियात होऊ घातलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत हिंदुस्थानी संघाचा निभाव लागेल असे मला वाटत नाही. हे लिहिताना माझ्या काळजाला इंगळय़ा डसतायत. पण जे माझ्या निःपक्षपाती डोळय़ांना समोर दिसतंय तेच मी सांगतोय.

सातत्यपूर्व चांगली व विजयी कामगिरी करण्यासाठी संघात जे बळ लागतं ते आपल्याकडे आहे असं सकृतदर्शनी तरी मला वाटत नाही. एका जडेजाच्या नसण्यानं संघाचा एकूणच क्षेत्ररक्षणाचा दर्जा खालवावा हे पटत नसलं तरी मान्य करावं लागतं. मैदानात कुठूनही थेट स्टंप्सचा वेध घेण्याची क्षमता एकटय़ा जडेजात होती. प्रशिक्षक राहुल द्रविडचं याबाबत मत ऐकायला मला आवडेल.

संघात मॅच-विनर म्हणता येतील असे कोण आहेत? माझ्या मते दोघंच-हार्दिक पांडय़ा व सूर्यकुमार.

आपण एकेक खेळाडू समोर ऐरणीवर घेऊन त्याचं मूल्यमापन करायचा प्रयत्न करूया.

रोहित शर्मा ः तडाखेबंद फलंदाज, पण तीस-पस्तीसच्या पुढे क्वचितच जातो. स्क्वेअर-लेग व मिड-विकेटला हुक न पुलच्या बळावर षटकार ठोकणे ही खासियत, पण सगळय़ा प्रतिपक्षांना ती ज्ञात असल्याने हटकून त्याच्यासाठी तिथे सापळा लावला जातो. तो अडकतो. जणू बॅटचीच चूक असल्यागत तो बॅटकडे बघत बघत परततो.

के. एल. राहुल ः आजारातून अजून सावरतोय.

विराट कोहली ः प्रदीर्घ कालानंतर पुन्हा गवसलेला फॉर्म असाच कायम राहणार असेल तर बल्ले बल्ले; अन्यथा मधल्या फळीला खिंडार तिसऱया नंबरापासूनच पडेल.

सूर्यकुमार ः दमदार, आक्रमक फलंदाज पण सातत्याचा अभाव. टी-20 लढतीत तसे सातत्य नसतेच. अपवाद पाकिस्तानचा रिझवान.

ऋषभ पंत ः जबरदस्त फलंदाज, पण अलीकडे पार निराशा केली. अकारण ‘रिव्हर्स स्वीप’ विकेट गमावणाऱया पंतने आपल्या डोक्याविषयीही प्रश्न निर्माण केलेत.

हार्दिक पांडय़ा ः कामाचा माणूस. अष्टपैलू अस्तित्व.

दिनेश कार्तिक ः गौतम गंभीर अगदी बरोबर बोलतो. आपण सोडून दुसरा कोणता देश शेवटच्या दहा चेंडूंसाठी मारझोड करणारा खास स्पेशॅलिस्ट फलंदाज संघात घेतो? एवढा  जर तुमचा त्याच्यावर भरवसा असेल तर त्याला एखाद्या फलंदाजाच्या ऐवजी व जागी वर खेळवा. फलंदाज खेळत नाहीत म्हणून कार्तिकनं खेळायचं तर मग गोलंदाज विकेट्स काढत नाहीत म्हणून त्या रोहित शर्मा, राहुल, कोहली व पंत यांनी काढायच्या का?

रविचंद्रन अश्विन ः आपण खेळतोय की नाही या संभ्रमात कायम असणारा गोलंदाज. पूर्वीची भेदकता व फलंदाजांवरील वचक गमावून बसलेला फिरकीपटू.

हर्षल पटेल ः तसा अचूक आहे. ‘यॉर्कर’ हुकमी टाकतो. पण एकदा मार खायला लागला की मारच खात सुटतो. अशा वेळेला त्याचे ‘यॉर्कर’ कुठे जातात?

अक्षर पटेल ः गुणी आहे. पण जडेजाऐवजी आपण संघात आहोत हे त्यानं डोक्यातून काढून टाकावं. गोलंदाजी व फलंदाजी अधिक टाइट करावी.

भुवनेश्वर कुमार ः आजच्या घडीला तो प्रमुख वेगवान का व कसा? धुमश्चक्रीच्या अखेरच्या षटकांत त्याला राखून का ठेवतात? त्याच्या ढिसाळ षटकांत सामना गमावणे सुकर होते.

जसप्रीत बुमराह ः संघातील एकमेव वेगवान चांगला गोलंदाज.

युजवेंद्र चहल ः नॉट बॅड. संघात हवा.

आपल्या निवड समितीचा युवा पिढीवर विश्वास नाही. म्हणूनच पृथ्वी शॉ, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड या तळपत्या फलंदाजांना संघात स्थान नाही. एक अर्शदीप सोडला तर नवीन वेगवान गोलंदाजांना आपल्याकडे थारा नाही. जुनाजाणता शमी यांना का कोण जाणे पसंत नाही. तरुण फिरकी गोलंदाजांचा शोध चालू असल्याचेही दिसत नाही. एक बिष्णोई मिळालाय तर त्याला सातत्यानं खेळवतात कुठे? माफ करा, पण ही चिन्हे मला तरी चांगली वाटत नाहीत. आपल्या संघाला विश्वचषक लढतीत भवितव्य आहे हे म्हणायला जीभ रेटत नाही.

या उपर कोणा खेळाडूनं उचल खाल्ली, कोणा खेळाडूनं मुसंडी मारली आणि आपण जेतेपद पटकावले तर त्यात माझ्याइतका आनंद कोणालाच नसेल.

[email protected]