
>> शिरीष कणेकर
माझी सात वर्षांची नात माझ्याशी बोलत नाही. हजारो मैलांवरून तिनं हा जगावेगळा अबोला धरलाय. मी तिच्या आईशी माझ्या लेकीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना ती शेजारी बसून हाताने चेहरा झाकून घेते. तिला माझा चेहरा बघायचा नसतो व स्वतःचा चेहरा मला दाखवायचा नसतो. अमेरिकेत ‘हेट युअर ग्रँडपा’ हा खेळ खेळत असावेत. तिला कदाचित ‘हेट’ करायला माझ्याहून अधिक तिरस्करणीय कोणी भेटलं नसावं. मी तरी भेटतो कुठे, सगळं फोनवरच. ‘फोन अ फ्रेंड’ मी ऐकलं होतं. ‘हेट ग्रँडपा ऑन फोन’ हा या जातकुळीतला नवीन ‘ट्रेंड’ असावा.
झालं काय, तर काहीच झालं नाही. म्हणजे माझ्या दृष्टीनं काहीच झालं नाही, पण तिच्या दृष्टीनं आकाश कोसळलं होतं. मला तिच्याशी काय बोलावं हा नेहमीच प्रश्न पडायचा. तिचं अमेरिकेतील (सात वर्षांचं) जीवन वेगळं, माझं हिंदुस्थानातील (अठ्ठ्याहत्तर वर्षांचं) जीवन वेगळं. त्यांचा ‘वॅफल’चा ब्रेकफास्ट वेगळा, माझी कांदेपोह्यांची न्याहारी वेगळी. ती सायकलवरून शाळेत जाणार, मी पायी बाजारात जाणार. ती ‘ओह शिट्’ म्हणणार, मी ‘अरे देवा’ म्हणणार. ती कुटुंबासमवेत ‘ऍपल पिक अप’ (म्हणजे झाडावरची सफरचंदे तोडायची.) पिकनिकला जाते, मी कुटुंबाला घरी ठेवून अंगणातला कचरा वेचायला जातो. ती घरात पियानो वाजवते. मी घरात तोंड वाजवतो. (घरातील दुसऱ्या अधिक स्फोटक तोंडानं वाजवू दिलं तर!) ती योग करते, मी गुरगुर करतो. कुठेच काही साधर्म्य नाही. बोलायचं कुठल्या विषयावर? मग मी आवाजात मध आणून तिला विचारतो, ‘काय केलास आज ब्रेकफास्ट?’ ती उखडते. प्रत्येक वेळेला ब्रेकफास्टच्या पंचायती. तेच आणि तेच विचारायचं. ‘इफ यू हॅव नथिंग एल्स टू टॉक देन डोण्ट टॉक!’
मी फोनवर मान खाली घालतो. दुसरं काय बरं विचारावं? बरं, मी तिला उत्तरं देईन तर तिला काहीच विचारायचं नसतं. माझ्या दैनंदिन गोष्टीत तिला काहीच स्वारस्य नसतं. मी काय जेवलो शी गिव्हज अ डॅम. माझ्याकडे कोण आलं होतं? डझंट मॅटर टू हर. आमच्याकडे दिवाळीला काय असतं सांगावं तर शी इज नॉट इव्हन रिमोटली कन्सर्ड. तिला ख्रिसमसचे वेध लागलेले असतात. त्याबद्दल मला काही सांगावं तर ‘डूड डझन्ट नो एनिमिंग.’
तर झालं काय, माझ्या लक्षात आलं की नातबाईंना गाण्यात रस आहे. तेही हिंदी सिनेमातल्या गाण्यात. काय सांगताय तरी काय? आर यू किडींग? मी आऊट झालो. तसं ती मराठी बोलते. माझ्याशी नाही हो, एकंदरीत बोलते, पण हिंदी गाणी? कहर आहे. हा धागा पकडून म्हटलं तिच्याशी हिंदी चित्रपट संगीतावर काहीतरी बोलावं. ती एकदमच नवीन पिढीची होती. म्हटलं आजकाल गाजत असलेल्या गायक-गायिकांविषयी काहीतरी तिला खूश करणारं बोलावं (गाण्यांविषयी बोलायला ती मला माहीतच नव्हती.) कोणीतरी एक नेहा कक्कर होती म्हणे. मी तिला काळी की गोरी पाहिली नव्हती. ऐकली तर नव्हतीच नव्हती. पण तरुण पोरापोरींना आवडते म्हणे.
‘तू नेहा कक्करसारखी गातेस.’ मी नातीला हरभऱ्यावर चढविण्यासाठी म्हणालो. वास्तविक मी नेहाप्रमाणेच नातीलाही ऐकलं नव्हतं.
तिचा प्रतिसाद अत्यंत अनपेक्षित होता. तिनं फोन आदळला आणि ती तरातरा निघून गेली. दॅट वॉज द बिगिनिंग ऑफ हर अबोला विथ मी.
नंतर (ती शाळेत गेलेली असताना) माझ्या मुलीनं मला सांगितलं, ‘काय करून बसलात, पपा? अहो तिला नेहा कक्कर आवडत नाही.
देवा माझ्या देवा! करायला गेलो एक आणि झालं भलतंच. आता मी काहीही करून उपयोग नव्हता. द डॅमेज वॉज डन! आता ती दोन माणसांचा तिरस्कार करत होती. नेहा कक्कर आणि पपा कणेकर.
‘ते मुद्दाम मुद्दाम मला चिडवतात आणि त्रास देतात.’ माझी नात तिच्या आईपाशी म्हणाली.
‘नाही गं वेडाबाई.’ माझी मुलगी समजुतीच्या सुरात तिला म्हणाली, ‘ते म्हातारे झालेत. आपण काय बोलतो त्यांना कळत नाही.’
‘नॉट दॅट ओल्ड. माझ्या एका मैत्रिणीचे आजोबा तर नव्वद आहेत. माझ्या मुलीनं उसासा व नाद सोडला.
थोड्या दिवसांनी मी माझ्या मुलीला फोनवर विचारलं, ‘तिला आवडतं तरी कोण?’
‘लता मंगेशकर.’ मला उत्तर आलं.
मी खुर्चीवरून कोसळलोच. लता मंगेशकर? या अमेरिकन नागरिक असलेल्या चिमुरड्या अंगठ्याएवढ्या पोरीला चक्क लता मंगेशकर आवडते? मुळात तिला लता मंगेशकर माहीत कशी? तिनं लता कुठे ऐकली? मी चक्रावून गेलो.
‘तू तिला सांगितलंस की नाही की मी लता मंगेशकरला ओळखतो म्हणून?’
‘सांगितलं ना, मी तिला लता मंगेशकर आपल्याकडे आल्या होत्या तेव्हाचे फोटो दाखवले.’
‘मग?’ मी अति उत्सुकतेने विचारलं,
ती म्हणाली, ‘पपा चोंबडे आहेत. मोठ्या लोकांना चिकटतात.’
‘पण पापा स्वतःच मोठे आहेत.’ माझ्या मुलीनं मला वाचवण्याचा शेवटचा निकराचा निष्फळ प्रयत्न केला.
‘आय डोंट थिंक सो.’ नातीनं इंग्लिशमध्ये संभाषणाचा समारोप केला. आता काही ईश्वरी चमत्कारानं मी अबोला संपण्याची वाट बघतोय. नेहा कक्करचे एकही गाणं न ऐकता मी तिला केराची टोपली दाखवली. बिच्चारी!…





























































