
सामना प्रतिनिधी। शिरूर
शिरूर तालुक्यातील कवठे येमाईच्या पळसकरवस्ती आणि पोकळ दऱ्यांमध्ये दोन बिबट्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. पाळीव प्राण्यांना बिबट्या लक्ष करीत आहे. यामुळे रात्रीच्या वेळी शेतात पाणी भरण्यासाठी जाणाऱ्या शेतक-यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे .
बुधवारी पहाटे वसंत पोकळे हा ग्रामस्थ जात असताना रस्त्यावर अचानक बिबट्या अवतरला. यामुळे वसंत यांची भीतीने गाळण उडाली. त्यानंतर त्यांनी याबद्दल गावकऱ्यांना माहिती दिली. बुधवारीही या परिसरात दोन बिबट्यांच्या पाऊलखुणा दिसल्या. त्याआधी कोंडीभाऊ पळसकर या नागरिकाची ९ महिन्याची कालवड बिबट्याने फस्त केली होती. त्यानंतर हे बिबटे आता पाळीव प्राणी, कुत्री यांची शिकार करू लागले आहेत. भक्ष्याच्या शोधात हे बिबटे मानवी वस्तीमध्ये येऊ लागले आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी शेताची राखण करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.






























































