शिरुर- बिबट्यांच्या मुक्त संचाराने नागरिक दहशतीखाली

257
leopard

पाण्याच्या उपलब्धतेमुळे बारमाही बागायती क्षेत्र झालेल्या शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात बिबटयांची मोठीच दहशत निर्माण झाली आहे. कवठे येमाईच्या मुंजाळवाडी, येडे-बोऱ्हाडेवस्ती नजीक उसाच्या शेतातून हे बिबटे आपल्या पिलांसह दिवसही नागरिकांना पाहावयास मिळत असून वीज, पाणी असूनही बिबटयांच्या दहशतीमुळे शेतात कामे करायची कशी? असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

मुंजाळवाडीत मेंढपाळ संपत हिलाळ व त्यांच्या पत्नी अलका या आपल्या मेंढरांसोबतच तळावर वास्तव्यास असताना व जवळच विजेचा प्रकाश असल्याने त्यांना 2 बिबटे 2 पिल्लांसह पाहावयास मिळाले. ते दोघेही जागे होत सावध झाल्याने बिबट्यांचा कळप शांतपणे बाजूच्या शेतात निघून गेला. तर येथीलच महादू धोंडिबा हिलाळ यांचे पाळीव कुत्रे बिबटयांनी फस्त केल्याचे भाऊसाहेब खंडू हिलाळ यांनी सांगितले. दरम्यान टाकळी हाजी रोडवर असलेल्या येडे – बोऱ्हाडे वस्तीवर ही एक मादी बिबट्या व 2 पिल्लांचे वास्तव्य असल्याचे डॉ. संपत महादू गावडे, सोपान वागदरे, बाळासाहेब येडे यांनी सांगितले. येथील अनेक शेतकऱ्यांना या बिबट्यांचे दिवसा दर्शन झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

ज्या ज्या परिसरात मादी बिबटे आपल्या पिल्लांसह नागरिकांना दिसून येत आहेत, त्या ठिकाणी पिंजरा लावणे शक्य होत नाही. यदाकदाचित त्या परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात जर बिबट्याचे पिल्लू अडकले तर मादी चवताळते व त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास होऊ शकतो. अशा वेळी त्या ठिकाणच्या नागरिकांनी पिल्लांसह बिबटे आढळल्यास दक्षता घेत फटाके, बॉम्ब फोडावेत. बाहेर जाताना समूहाने व मोठ्याने गप्पा मारत, आवाज काढीत जावे, रात्रीच्या वेळी शेतवस्तीवरील नागरिकांनी अत्यंत महत्वाचे काम असेल तरच बाहेर पडावे, सोबत बॅटरी, काठी व सुरक्षितता म्हणून इतरांनाही सोबत घ्यावे. एकमेकांना मोबाईलवरून कल्पना द्यावी, असं आवाहन शिरूरचे वनक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी केलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या