
सामना प्रतिनिधी । बीड
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जिल्हाभरात शिवभक्तामध्ये उत्साह संचारला आहे. सकाळपासूनच मिरवणुका शोभायात्रा आणि चौकाचौकात छत्रपतींच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून अभिवादन केले जात आहे.
संपूर्ण जिल्हाभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. छत्रपतींच्या पुर्णाकृती पुतळ्यासमोर मोठी सजावट केली आहे. रस्त्यांच्या दुतर्फा भगवे झेंडे आणि कमानींनी शहरात भगवे वातावरण झाले आहे. मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने भव्य शोभायात्रा शहरात काढण्यात आली. या रॅलीमध्ये हजारो शिवभक्त सामील झाले. भगव्या साड्या परीधान केलेल्या महिलांचा सहभाग लक्षणीय होता. छत्रपतींच्या पुतळ्याजवळ भगवे फेटे बांधलेल्या शिवभक्तांची मोठी गर्दी होती. शिवशाहीरांच्या पोवाड्यांनी अवघे वातावरण शिवमय झाले आहे.


























































