बम बम भोले! व्हिएतनाममध्ये खोदकामादरम्यान 1,100 वर्षांपूर्वीचे शिवलिंग सापडले, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

दक्षिण आशियाई देश व्हिएतनाम आणि हिंदुस्थानचे संबंध शेकडो वर्ष जुने आहेत. याचे पुरावे वेळोवेळी मिळाले आहेत. येथे चौथ्या शतकापासून ते तेराव्या शतकापर्यंतची बौद्ध धर्म आणि हिंदू धर्माची निगडित जुन्या कलाकृती सापडल्या आहेत. नुकत्याच झालेल्या एका उत्खननात अकराशे वर्षांपूर्वीचे शिवलिंग सापडले आहे. हे शिवलिंग बलुआ दगडात कोरलेले आहे. हिंदुस्थानचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली असून फोटो शेअर केले आहेत.

पुरातत्व विभागाला खोदकामादरम्यान नवव्या शतकातील शिवलिंग सापडले आहे. बलुआ दगडात कोरण्यात आलेले हे शिवलिंग 1100 वर्ष जुने आहे. विशेष म्हणजे आजही एवढ्या वर्षांनंतर शिवलिंगाची थोडी देखील झीज झालेली नाही. व्हिएतनामच्या ‘माई सोन मंदिर’ परिसरात सुरू असलेल्या उत्खननात हे शिवलिंग सापडल्याची माहिती पुरातत्व विभागाने दिली.

save_20200528_151008

परराष्ट्रमंत्र्यांचे ट्विट
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी या शोधाबाबत पुरातत्व विभागाचे अभिनंदन केले आहे. जयशंकर यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर नवव्या शतकातील या शिवलिंगाचे फोटो ट्विट केले आहे. माई सोन मंदिर परिसरात सुरू असलेल्या खोदकामात हे शिवलिंग सापडले, असे ट्विट एस. जयशंकर यांनी केले आहे. या फोटोसोबत एस. जयशंकर यांनी 2011 मध्ये या भागाचा दौरा केला होता, त्याच्या आठवणी ताज्या केल्या. हा मंदिर परिसर हिंदुस्थानच्या दृष्टीने महत्वाचा असून यापूर्वी येथे भगवान राम-सीता यांच्या विवाहाच्या कलाकृती, नक्षीदार शिवलिंग सापडले होते.

चंपाच्या राजाने केले होते मंदिराचे निर्माण
व्हिएतनाममधील माई सोन मंदिरावर हिंदू धर्माचा प्रभाव दिसून येतो. येथे श्रीकृष्ण, विष्णू, शंकर यांच्या अनेक मूर्ती आहेत. हे मंदिर चंपाच्या राजाने चौथ्या ते 14 व्या शतकादरम्यान केले होते. व्हिएतनामचा हा भाग तेव्हा हिंदू राज्याचा भाग होता. चम समुदायाच्या लोकांचा प्रभाव येथे दुसऱ्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत होता. चम समुदायाचे लोक हिंदू होते,मात्र पुढे त्यांनी बौद्ध आणि इस्लाम धर्म स्वीकारला. व्हिएतनाम-अमेरिका युद्धादरम्यान या मंदिराचे प्रचंड नुकसान झाले.

आपली प्रतिक्रिया द्या