
फुफ्फुसाच्या कॅन्सरने ग्रासलेल्या अत्यंत गरिब रूग्णावर पैशाअभावी उपचाराला अडथळा येऊ नये म्हणून वडवणी तालुक्यातील शिवसैनिकांनी एकत्र येऊन 40 हजार रूपयाची रक्कम जमा केली आणि पुढील उपचारासाठी सतिश शेंडगे कॅन्सरग्रस्त व्यक्तीला दिले. शिवसैनिकांचे दातृत्व पाहून सतिश शेंडगे यांचे डोळे पाणावले.
वडवणी तालुक्यातील परडी माटेगाव येथील शिवसैनिक सतिश शेंडगे यांना फुफ्फुसाचा कॅन्सर हा आजार जडला आहे. परिस्थिती जेमतेम असल्याने उपचारासाठी त्यांना मदत देण्यासाठी शिवसैनिक सरसावले. संपर्कप्रमुख आनंद जाधव यांच्या आदेशाने जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली वडवणी तालुक्यातील शिवसैनिकांनी विनायक मुळे यांच्या सोबतीने मदतीची हाक दिली. अवघ्या काही वेळात शिवसैनिकांनी 40 हजार रूपयांची रक्कम जमा केली.
विनायक मुळे, वचिष्ठ शेंडगे, युवराज शिंदे, संजय धपाटे, अशोक गोंडे, सचिन धपाटे, महेश रासवे या सामान्य शिवसैनिकांनी जमलेली रक्कम उपचारासाठी सतिश शेंडगे यांच्याकडे सुपुर्द केली. आमच्यासारखेच सामान्य असलेल्या या शिवसैनिकांनी जमा केलेली ही रक्कम पाहून सतिश शेंडगे यांचे डोळे पाणावले. काल शेंडगे यांच्या घरी जाऊन ती रक्कम त्यांच्याकडे देण्यात आली.





























































