शिवसेना पूरग्रस्त कोल्हापूरकरांच्या पाठीशी, आदित्य ठाकरे यांनी केली पाहणी

965
aaditya-thackeray-shiv-sena

सामना प्रतिनिधी । कोल्हापूर

‘गणपती बाप्पाचा आशीर्वाद सर्वांच्या पाठीशी आहे. कोणी विचार केला नाही अशा महापुराच्या मोठ्या आपत्तीतून आपण उभे राहिलात. तुम्ही हाक मारा शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. मदतीसाठी आवाज द्या’, अशा शब्दात शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पूरग्रस्त कोल्हापूरकरांना साद घातली.

‘तुम्ही हाक मारा संपूर्ण शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. जात धर्म भाषा न पाहता घरोघरी येऊन मदत करणार’, असा दिलासा आदित्य ठाकरे यांनी पूरग्रस्तांना दिला. पूरग्रस्तांच्या हिमतीला दाद देत, बचाव कार्य करणाऱ्या सर्वांनाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी जाहीर सलाम केला.

नुकत्याच उद्भवलेल्या प्रलयंकारी महापुरामुळे अपरिमित हानी झालेल्या कोल्हापुरकरांना दिलासा देण्यासाठी शिवसेना नेते व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज येथील पुरबाधित दु:खीतांचे अश्रु पुसण्याचा प्रयत्न केला. मोडून पडलेला संसार आणि व्यवसाय पुन्हा नव्या दमाने सुरू करण्याचा विश्वास निर्माण केला. सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील पुरग्रस्तांची भेट घेऊन, त्यांना जीवनावश्यक वस्तूंची भेट दिल्यानंतर रात्री उशिरा आदित्य ठाकरे कोल्हापूरात दाखल झाले. आज सकाळी अकराच्या सुमारास शहरात पूर आलेल्या बापट कॅम्प परिसरात भेट देऊन नुकसानग्रस्त नागरिक आणि गणेश मूर्तिकारांना धीर दिला. यावेळी पिण्याच्या पाण्याच्या ताक यांसह जीवनावश्यक अन्नधान्य वस्तू असा शिधाही आदित्य ठाकरे यांनी पूरग्रस्तांना वाटप केले.

aaditya-thackeray-help

याप्रसंगी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, असल्याचे कधी कोणी विचार केला नाही असा येथे महापूर आला. आपण त्यातून उभे राहिलात. पुरातून बाहेर काढण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली, त्या सर्वांना सलाम गणपती बाप्पाचे आशीर्वाद आहेतच.

मुंबईतून ही पूर्ण शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. ठाण्यावरून ही शिवसेना नेते व मंत्री एकनाथ शिंदे यांनीही मदत केली. मुंबईत आम्ही चारशे मिली पाऊस दररोज बघतो. पण येथे पडणाऱ्या पावसामुळे जन आशीर्वाद यात्रा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. येथील पावसाची पाहणी करण्यासाठी मंत्री एकनाथ शिंदे येथे आले. पण येथे येऊन ते मदत करतच राहिले. ही एकमेव मदत नाही तर कोल्हापूरला पूर्ण उभे करायचे आहे. सरकार सुद्धा सर्वतोपरी मदत करणार आहे. आपण ही मदत करून घेणारच आहे. ही नैसर्गिक आपत्ती असून, जिथे जिथे पूर आला. अशी आपत्ती आली तिथे कोणताही जात, धर्म आणि कोणाची भाषा न पाहता मदत कार्य सुरू आहे. सर्वांना मदत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. घरोघरी जाऊन सुद्धा मदत देणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना नेते व आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार राजन विचारे, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार सुजित मिणचेकर, आमदार उल्हास पाटील, उदय सामंत, युवा सेनेचे सिद्धेश कदम हर्षल सुर्वे पाटील, मंजित माने, वीरेंद्र मंडलिक आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या