शिवसेनेला बळकटी आली, भगवे दिवस सुरू झाले! उद्धव ठाकरे यांचा विश्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

शिवसेनेची बांधिलकी जनतेशी आहे. आपल्यावर जनतेचा विश्वास वाढत आहे. शिवसेनेला बळकटी आली आहे. भगवे दिवस सुरू झाले आहेत. शिवरायांचा भगवा जसा लोकसभेवर फडकवला तसा येणाऱया निवडणुकीत विधानसभेवर फडकविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला.

शहापूरमधील राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी शिवसेना भवन येथे शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणुका आल्यानंतर या पक्षातून त्या पक्षात लोक जातात. पण शिवसेनेत जी माणसं येत आहेत ती प्रलोभनं न दाखवता, विश्वासानं आणि प्रेमाने जिंकलेली माणसं आहेत. शिवसेनेला जे यश आज मिळत आहे ते लोकांच्या विश्वासामुळेच. आपण लोकांची सेवा करतोय. लोकांचा विश्वास आपल्यावर वाढतोय. शिवसेना हा विश्वास सार्थ ठरवेल.

बालेकिल्ला अभेद्यच

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे आनंद दिघे यांनी जी विजयाची बीजे पेरली त्यामुळे ठाणे जिल्हा हा नुसता बालेकिल्ला नाही तर अभेद्य बालेकिल्ला झाला. कित्येक लाटा आल्या आणि गेल्या. येणाऱया लाटा यावर येऊन फुटल्या, पण या अभेद्य किल्ल्याला साधा चरासुद्धा गेला नाही. याचं कारण ती जी बांधणी आहे ती त्यावेळी झाली. मर्द शिवसैनिकांनी ही बांधणी अभेद्य ठेवली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा शिवसेनेत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना भवन येथे राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी बुधवारी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र फाटक, आमदार संजय शिरसाट आदी उपस्थित होते.