भाजपाला हिंदुत्व शिवसेनाप्रमुखांनी शिकवले, जयंत पाटलांचा भाजपावर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपाला हिंदुत्व शिकवलं. हिंदुत्व स्वीकारण्याचा आग्रह केला आणि त्यांच्या घरासमोर जावून हनुमान चालिसा म्हणण्याचा हट्ट म्हणजे ही थट्टा आहे, असे म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपावर निशाणा साधला.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे आज बीडमध्ये आले होते. आमदार संदीप क्षीरसागर यांना मातृशोक झाल्यानंतर त्यांनी रविवारी क्षीरसागर कुटुंबियांची भेट घेतली. क्षीरसागर कुटुंबियाचे सांत्वन केले. स्वर्गिय रेखाताई क्षीरसागर यांना श्रद्धांजली अर्पण करत क्षीरसागर परिवारास या दु:खातून सावरण्याची शक्ती मिळो अशी प्रार्थना केली आणि बीडमधून निघताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला

सरकार पडत नाही म्हणून जाणिवपूर्वक मुख्यमंत्र्यांच्या घरापुढे जाणे, शिवसेना पक्षप्रमुखांना आव्हान देणे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह प्रशासनाला आव्हान देणे हे चूक आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपाला हिंदुत्व शिकवलं. हिंदुत्व स्वीकारण्याचा आग्रह केला आणि त्यांच्या घरासमोर जावूनच हनुमान चालिसा म्हणणं ही थट्टा आहे, हा जाणिवपूर्वक केलेला कट असून कायदा सर्वांना सारखा, त्यांना झालेली अटक कायद्याप्रमाणे झालेली आहे. त्यांना काय गोंधळ घातला हे सर्व जगाने पाहिले आहे, असेही जयंत पाटील बोलताना म्हणाले.